EXCLUSIVE केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा कृतीरूप आदर्श! मंत्रीपदाचे सहा महिन्यांचे वेतन देणार दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी; वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचा संकल्प!सेवाभावाला कृतीची जोड!

 
 मेहकर (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी आपल्या मंत्रीपदाचे तब्बल सहा महिन्यांचे वेतन मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त निधीसाठी देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. वाढदिवसाचा आनंद सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांतून साजरा करतानाच त्यांनी सेवाभावाला आर्थिक योगदानाची जोड देण्याचा संकल्प व्यक्त केला. प्रा. सचिन जाधव मित्र मंडळाच्या वतीने मेहकर येथे आयोजित अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि आरोग्य सेविकांच्या सन्मान सोहळ्यात त्यांनी ही घोषणा केली.

प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकरच्या डीपी रोडवरील भव्य शामियाण्यात सहा दिवस श्रीराम कथा यज्ञ आणि विविध कीर्तनांचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी श्री हरिचैतन्यजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या धार्मिक सोहळ्याची सांगता झाली. यावेळी आठ हजार भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कोरोना काळात तसेच दैनंदिन आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मेहकर व लोणार तालुक्यांतील तब्बल १,६०० अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि आरोग्य सेविकांचा साडी, योगा मॅट व स्मृतिचिन्ह देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. शिवसेनेच्या राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे या सोहळ्याच्या विशेष अतिथी होत्या. आरोग्य सेवेत अहोरात्र योगदान देणाऱ्या महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे ही आगळीवेगळी बाब असल्याचे खासदार वाघमारे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या तीन हजार मुला-मुलींना सायकली; महिलांना तीन हजार शिलाई मशीन!

येत्या २७ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेहकर येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना तीनचाकी सायकली, शेतकरी कुटुंबांतील तीन हजार मुला-मुलींना सायकली, तसेच जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांतील विधवा व परित्यक्ता महिलांना तीन हजार शिलाई मशीन वितरित करण्याच्या शिवसेनेच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जाधव यांनी दिली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

या सोहळ्याला माजी आमदार संजय रायमुलकर, माजी आमदार तोताराम कायंदे, शिवसेनेचे जिल्हा संघटक दिलीपबापू देशमुख, बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी जाधव, किसन बळी, सुरेशतात्या वाळूकर, भगवानराव सुलताने, जयचंद बठिया, प्रा. डॉ. सचिन जाधव, राहुल देशमुख, ॲड. उल्हासराव जाधव, विजयराव जाधव, दत्तात्रय टेकाळे, मदनराव चनखोरे, समाधान साबळे, नीरज रायमुलकर, राजीव काटे, विशाल जवंजाळ, भूषण घोडे, संदीप आल्हाट, नंदू बंगाळे, शिवकुमार तेजनकर, मायाताई म्हस्के, आरती दीक्षित, वैशाली सावजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गजानन घायाळ यांनी केले.