EXCLUSIVE राज्य निवडणूक आयोगाची अतिघाई! २६ नोव्हेंबरला चिन्हांचे वाटप; उमेदवारांनी चिन्ह घराघरात पोहोचवायचे कसे? प्रचारासाठी फक्त ४ दिवस, त्यातला १ दिवस तर....
Updated: Nov 4, 2025, 19:33 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या कित्येक दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राज्य निवडणूक आयोगाने अखेर आज राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या या कार्यक्रमावर सर्वच स्तरातून नाराजीचा सूर उमटत आहे. विशेषता: राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा अपक्ष उमेदवारांना मोठा फटका बसणार आहे. २६ नोव्हेंबरला चिन्हांचे वाटप झाल्यानंतर प्रचारासाठी अवघे चार दिवस उरणार आहेत, त्यातला एक दिवस चिन्हांची छपाई, बॅनर व रथ तयार करणे यात जाणार असल्याने अवघ्या ३ दिवसांत कसे करायचे? असा सवाल उपस्थित झाला आहे...
राज्यातील प्रलंबित असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा आज राज्य निवडणूक आयोगाने केली. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उरकण्याचे आदेश दिल्याने राज्य निवडणूक आयोगाकडून अतिशय घाई करण्यात आली आहे. एकीकडे विरोधक मतदार याद्यांच्या मुद्द्यांवरून आक्रमक आहेत, विरोधकांच्या प्रश्नांचे समाधान झालेले नाही, काहींनी यावर न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला आहे.
दरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडून आज नगरपरिषदा आणि नगरपंचायतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.
१८ नोव्हेंबरला अर्जांची छाननी तर २१ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येईल. २६ नोव्हेंबरला उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे. त्यानंतर अवघ्या ५ दिवसानंतर म्हणजेच २ डिसेंबरला मतदान होणार आहे. मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना याचा फारसा फटका बसणार नसला तरी अपक्ष उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाच्या घाईगडबडीच्या निर्णयाचा फटका बसणार आहे.
प्रचारासाठी अवघे चार दिवस हातात उरणार आहेत. त्यातला १ दिवस उमेदवारांना प्रचाराचा रथ बनवणे, चिन्हांचे पत्रक छापणे असा धरला तर अवघ्या तीन दिवसात करावे तरी काय? असा पेच अपक्ष उमेदवारांसमोर असणार आहे. राजकीय पक्षाच्या उमेदवारांना सुद्धा डमी मतपत्रिका २६ नोव्हेंबर नंतरच छापता येईल, कारण चिन्हांचे वाटप झाल्यानंतरच ईव्हीएम मशीनवर कोणता उमेदवार कितव्या क्रमांकावर हे स्पष्ट होणार आहे..एकंदरीत प्रचार करताना उमेदवारांची अतिशय तारांबळ उडणार आहे..