EXCLUSIVE अरेच्चा "एसआयआर" ची मुदत पुन्हा वाढली! आता अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबरला येणार! झेडपी निवडणुका पुन्हा लांबणार...!

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्रात सध्या एसआयआर मोहीम सुरू आहे. याआधी ३० जुलैपर्यंत बूथ लेव्हल अधिकाऱ्यांनी मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन पडताळणी करावी असा कार्यक्रम निश्चित झाला होता. त्यानंतर ही मुदत वाढवून ८ ऑगस्ट करण्यात आली होती,आता यात पुन्हा १० दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. आता १७ ऑगस्ट पर्यंत बूथ लेव्हल अधिकारी घरोघरी भेटी देणार आहेत. त्याचा एकंदरीत परिणाम अंतिम मतदार यादीच्या प्रसिद्धीवर होणार आहे. आधी ८ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती,त्यानंतर १८ ऑक्टोबर ही तारीख देण्यात आली होती..आता भारतीय निवडणूक आयोगाने केलेल्या नव्या बदलानुसार अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

कोणताही पात्र मतदार मतदार यादीच्या बाहेर नसावा आणि अपात्र मतदार यादीत नसावा हा एसआयआर मोहिमेचा उद्देश आहे. याशिवाय दुबार मतदार,मयत मतदार यांनाही यादीतून वगळण्यात येणार आहे. नव्या बदलानुसार १७ ऑगस्टला प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी आता २४ ऑगस्टला प्रसिद्ध होईल.२४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार असून अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रकाशित होईल..

झेडपी ,ग्रामपंचायत निवडणूक लांबणार..

दरम्यान लांबलेल्या एसआयआर प्रक्रियेमुळे महाराष्ट्रातील प्रलंबित असलेल्या झेडपी आणि ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणार आहेत. एसआयआर सुरू असल्यामुळे सध्या मनुष्यबळ कमतरता असल्याची बाब राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टासमोर मांडली होती, त्यामुळे एसआयआर झाल्यानंतरच या लांबलेल्या निवडणुका होणार आहेत..