EXCLUSIVE "दंड न आकारता" बनवाबनवी करून टिप्पर सोडण्याचे प्रकरण! लोणार एसडीओ आणि तहसीलदारांची चौकशी होणारच; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश;

 तहसीलदारांना मागितला अहवाल..जिल्हाधिकारी म्हणाले, दोषींवर कारवाई करू! 
 
 बुलढाणा(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार तहसील कार्यालयाशी संबंधित "दंड न आकारता" टिप्पर सोडल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. टिप्पर सोडण्यासाठी तहसीलदार श्री.भूषण पाटील यांनी "बनवाबनवी" केलेला तपासणी अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर केला होता. त्याच दिशाभूल करणाऱ्या चुकीचा अहवालाचा आधार घेत एसडीओ श्री.सानप यांना अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर चालक/मालक निर्दोष असल्याचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी एक रुपयाही दंड न आकारता टिप्पर सोडून दिले होते. "बुलडाणा लाइव्ह" ने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने जिल्हाधिकारी डॉ. प्रविण देवरे यांनी उपजिल्हाधिकारी महसूल समाधान गायकवाड यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. श्री.गायकवाड यांनी तहसीलदारांना या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 लोणारचे उपविभागीय अधिकारी श्री.सानप यांनी त्यांच्या पथकासह २७ मे रोजी दुपारी विना परवाना रेतीची वाहतूक करणारे टिप्पर पकडले होते. त्यावेळी टिप्पर चालकाला कोणताही परवाना सादर करता आला नव्हता. त्यामुळे सदर टिप्पर पोलिस ठाण्यात लावून ३.२९ मिनिटांनी अधिकाऱ्यांनी टिप्परसोबत फोटो सेशनही केले होते. मात्र त्यानंतर दोन दिवसांनी कोणताही दंड न आकारता एसडीओ श्री.सानप यांनी टिप्पर सोडून दिले.हा प्रकार उघडकीस झाल्यानंतर एसडीओ सानप यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी तहसीलदार श्री.भुषण पाटील यांच्या तपासणी अहवालाच्या आधारे टिप्पर सोडण्याचा आदेश दिल्याचे सांगत त्यांच्याकडे बोट दाखवले होते. बुलडाणा लाइव्ह ने केलेल्या पाहणीत तहसीलदार श्री.भूषण पाटील यांनी दिलेला तपासणी अहवाल दिशाभूल करणारा आणि पूर्णपणे चुकीचा असल्याचे समोर आले. टिप्पर चालक/ मालकाला वाचवण्यासाठी तहसीलदार भूषण पाटील यांनी "मेहरबानी" केली. दुपारी ३ वाजता पकडलेल्या टिप्परसाठी त्याच दिवशी दुपारी ३ वाजून ३२ मिनिटांनी काढलेल्या गौण खनिज वाहतुकीच्या परवाना पावत्या "वैध" असल्याचा अजब निष्कर्ष तहसीलदार भूषण पाटील यांनी काढला. नवख्या असलेल्या एसडीओ श्री.सानप यांनी डोळ्यावर पट्टी बांधून तहसीलदार भूषण पाटलांच्या चुकीचा अहवालावर भरोसा ठेवला,कोणतीही पडताळणी केली नाही. त्यामुळे शासनाकडे जमा होऊ शकणारा जवळपास ३ लाख ४८ हजार रुपयांचा दंड न आकारता टिप्पर सोडण्यात आले होते. 

दरम्यान ह्या प्रकरणाची कुजबूज सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. नवीन आलेल्या "एसडीओ" श्री. सानप यांना तहसीलदार भूषण पाटलांचा १ तारखेपर्यंतचा "हिशोब" माहिती नव्हता. टिप्पर पकडल्याची कारवाई झाल्यानंतर सगळे माहित झाले. त्यामुळे सगळा "हिशोब पूर्ण" केलेल्या टिप्परला सोडण्यासाठी बनवाबनवी करणारा अहवाल बनवल्याची चर्चा आहे. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. प्रविण देवरे यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर नक्की कारवाई होईल असे ते "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना म्हणाले.