EXCLUSIVE महावितरणचे दुर्लक्ष, खामगावातील एका ग्राहकाला ५९ महिन्यांनी आले तब्बल ३.७३ लाखांचे वीजबिल! 
ग्राहक मंचाने ग्राहकाची तक्रार फेटाळली, पण अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश.... काय आहे मॅटर?

 
 खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव शहरातील रमेश नामदेव भिसे यांना डिसेंबर २०२३ मध्ये ५९ महिन्यांनंतर महावितरणनने तब्बल ३ लाख ७३ हजार २८० रुपयांचे देयके थाेपवले. या अव्वाच्या सव्वा देयकाला भिसे यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचात आव्हान दिले हाेते. मात्र, मंचाने ही तक्रार फेटाळून लावताना संबंधित अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचा आदेश ९ जुलै २०२५ रोजी दिला आहे.

मंचाचे अध्यक्ष ओमप्रकाश किसनगोपाल भुतडा, स्वतंत्र सदस्य वर्षा संजय नेरकर आणि तांत्रिक सदस्य धीरज विश्वास चव्हाण यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. रमेश भिसे यांच्या घरात डिसेंबर २०१९ मध्ये नेट मीटरिंगसह सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती. महावितरणच्या वतीने नेट मीटरद्वारे वीजपुरवठा आणि सौरऊर्जेच्या युनिटचे योग्य लेखाजोखा ठेवून दरमहा अचूक व पारदर्शक बिल देणे ही त्यांची जबाबदारी होती. परंतु, उपकार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता (शहरी उपविभाग, खामगाव) यांच्या नियंत्रणाखाली ५९ महिन्यांपर्यंत कोणतेही वीजबिल न देता अचानक डिसेंबर २०२३ मध्ये ३,७३,२८० चे एकत्रित बिल पाठवण्यात आले. 
  भिसे यांनी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी तक्रार देत अवास्तव बिल रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर कार्यवाही करत उपकार्यकारी अभियंत्यांनी ही रक्कम १ लाख ७७,००० हजार रुपयांपर्यंत कमी केली, मात्र कोणतीही स्पष्ट लेखी कारणमीमांसा न देता ही सवलत दिली गेली, त्यामुळे बिलप्रक्रियेतील अनियमितता स्पष्ट झाली. ग्राहकाने दरमहा सरासरी ३०० युनिट वापर केला असून, ५९ महिन्यांसाठी महावितरणने सरासरी ३१८ युनिट दराने एकूण १८,७७० युनिटचे बिल तयार केले. त्यात सौरऊर्जेचा यथायोग्य विचार करण्यात आल्याने डिसेंबर २०२३ मधील बिल प्रक्रियेवर मंचाने अंतिमत: शिक्कामोर्तब केले. मात्र, मंचाने नमूद केले की, ५९ महिन्यांपर्यंत बिल न पाठविणे ही अतिशय गंभीर प्रशासकीय दुर्लक्षाची बाब आहे. यासाठी खामगाव उपविभागाचे सहायक अभियंता व लेखा विभाग प्रमुख यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयाेगाने दिले आहेत.