Exclusive मास्तरांची निवडणूक गाजणार! ४ जणांची माघार;तब्बल २६ उमेदवार रिंगणात! शिवसेना उबाठाच्या दत्तात्रय लहानेंचा अर्ज कायम! बुलढाणा जिल्ह्यात लहाने आणि देवकरांमध्ये मतविभाजन अटळ...

काँग्रेसच्या पोहरे आणि शिंदेसेनेच्या सरनाईकांमध्ये मुख्य लढत होण्याची चिन्हे..! १८ आमदार असलेल्या भाजपची भूमिका गुलदस्त्यात...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानपरिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाची यावेळेसची निवडणूक चांगलीच गाजणार आहे.आतापर्यंत केवळ शिक्षक संघटना या निवडणुकीच्या मैदानात उतरायच्या, अंतिम निकालात देखील संघटनांचे प्राबल्य रहायचे. यावेळी मात्र शिक्षक आमदार हा आपल्याच पक्षाचा झाला पाहिजे याची चढाओढ सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये पहायला मिळत आहे.प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत..काहींना जागावाटपात कराव्या लागणाऱ्या तडजोडींमुळे पक्षाकडून उमेदवारी मिळाली नसली तरी आता "मैत्रीपूर्ण लढत" या गोंडस नावाखाली ही निवडणूक लढली जाण्याची चिन्हे आहेत. दरम्यान स्वतः महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचा दावा करणारे शिंदेसेनेचे विद्यमान आमदार किरण सरनाईक आणि ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या मात्र शिक्षण संस्था, नातेगोते यांचे मोठे जाळे असणाऱ्या आदिती पोहरे यांच्यात मुख्य लढत होईल अशी आजघडीची चिन्हे आहेत..अर्थात निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे यात उलटफेर देखील होऊ शकतो..बुलढाणा जिल्हावासियांच्या दृष्टिकोनातून पाहता उबाठा शिवसेनेचे दत्तात्रय लहाने आणि "आदिती अर्बन पतसंस्थेचे" अध्यक्ष सुरेश देवकर या दोघांचेही अर्ज कायम असल्याने मतविभाजन अटळ आहे..यावेळी शिक्षकांचा आमदार  बुलढाण्यातला असावा अशी बुलढाणेकरांची स्वाभाविक इच्छा असली तरी दोघांचीही "इच्छाशक्ती" तेवढीच प्रबळ आहे का?  राजकारण बेरजेचे होते की वजाबाकीचे ? यावरच पुढच्या अनेक बाबी स्पष्ट होणार आहेत..याशिवाय विभागात ३० पैकी १८ आमदार असलेल्या भाजपची भूमिका देखील अजून गुलदस्त्यात आहे..भाजपच्या संगीता शिंदे आणि चंद्रशेखर भोयर दोघांचेही अपक्ष अर्ज कायम आहेत,त्यामुळे भाजपने सरनाईक यांच्याऐवजी शिंदे किंवा भोयर यांपैकी एखाद्याचे काम करण्याचा संदेश दिल्यास गणित आणखी बदलू शकते..

 

संघटनात्मक दृष्ट्या कमकुवत असलेल्या काँग्रेसने आदिती पोहरेंना उमेदवारी दिली आहे, पोहरे ऐनवेळी आल्या ही त्यांची पडती बाजू असली तरी त्यांचे अकोल्यासह, वाशिम अमरावतीचे संस्थात्मक संबंध..वडिलांची पुण्याई, बड्या– बड्या घराण्यांशी असलेले नातेसंबंध या बाबी त्यांना स्पर्धेत ठेवत आहेत. दुसरीकडे विद्यमान आमदार किरण सरनाईक यांना मिळालेली शिंदेच्या शिवसेनेची ताकद..त्यांची व्यक्तिगत संस्थात्मक ताकद आणि त्याहीपुढे जाऊन सरनाईकांना जमणारे "आकड्यांचे" गणित यामुळे पोहरे आणि सरनाईक यांच्यात मुख्य लढत होईल असे आजघडीला बोलले जात आहे. मात्र सरनाईकांचे गणित भाजपच्या भूमिकेवर देखील अवलंबून राहणार आहे..याशिवाय माजी आमदार श्रीकांत देशपांडे किती मते घेतात,कुणाला फटका देतात हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. पतसंस्थांचे मालक असलेल्या लहाने आणि देवकरांनी "हिशोब" करण्यात जास्त वेळ घालवला नाही तर त्यांची कामगिरी देखील समाधानकारक राहू शकते...


लहाने-देवकरांना राजकीय बेरजेपेक्षा स्वतःच्या हिशेबाची चिंता?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दत्तात्रय लहाने आणि आदिती अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश देवकर या दोघांचेही अर्ज कायम आहेत. दोघांनाही आपापल्या पातळीवर संस्थात्मक संपर्क आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याची क्षमता असल्याचे मानले जाते. मात्र निवडणुकीत केवळ संपर्क, संस्था आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा पुरेशी ठरत नाही. मतांचे रूपांतर विजयात करण्यासाठी व्यापक राजकीय गणित, संघटनात्मक समन्वय आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची तयारीही आवश्यक असते. बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षक मतदारांची मते एकवटली, तर जिल्ह्याला विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व मिळवण्याची संधी निर्माण होऊ शकते. मात्र लहाने आणि देवकर दोघेही मैदानात कायम राहिल्याने मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर पडणार, हा कळीचा मुद्दा बनला आहे. प्रश्न लहाने किंवा देवकरांनी निवडणूक लढवू नये असा नाही; प्रश्न आहे तो राजकीय वास्तवाचा! विजयाची शक्यता, मतदारांचे प्रत्यक्ष पाठबळ आणि मतविभाजनाचा संभाव्य परिणाम यांचा विचार करून रणनीती आखली जाणार की प्रत्येक जण आपापला हिशेब मांडत राहणार? बुलढाण्याच्या राजकीय हिताची भाषा करणाऱ्या नेत्यांना या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल.