घरात घुसला, वृद्ध महिलेला मारहाण केली, गळा दाबला! आरडाओरड होताच नागरिक धावले अन् आरोपीला पकडले!

 साखरखेर्ड्यात खळबळ; तोंडाला काळा रुमाल बांधून घरात शिरला, नथ काढली; नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

 
 साखरखेर्डा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : घरात एकट्या असलेल्या ६० वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात तोंडाला काळा रुमाल बांधून घुसायचे, तिला बेदम मारहाण करायची, तोंडात पायपुसणी कोंबून गळा दाबायचा आणि अंगावरील दागिने लुटण्याचा प्रयत्न करायचा! साखरखेर्डा येथील वार्ड क्रमांक ६ मध्ये १५ ऑक्टोबर रोजी सकाळी घडलेल्या या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेने जीवाच्या आकांताने आरडाओरड करताच शेजारी धावून आले. नागरिकांची चाहूल लागताच पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला महिलांनी धाडसाने पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. नागरिकांच्या तत्परतेमुळे या प्रकरणातील संशयित आरोपीला घटनास्थळावरून पळ काढता आला नाही.

घरात एकटी असल्याची संधी साधली!

साखरखेर्डा येथील श्री प्रल्हाद महाराज संस्थानमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या निर्मला रामचंद्र पंचाळ (वय ६०) या स्वयंपाकाचे काम आटोपून घरी परतल्या होत्या. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते ११.३० वाजेदरम्यान त्या घरात एकट्याच होत्या. याच संधीचा फायदा घेत त्याच वार्डातील शेख सोरभ शेख रहीम ऊर्फ शेरा हा तोंडाला काळा रुमाल बांधून चोरीच्या उद्देशाने त्यांच्या घरात शिरला. घरात प्रवेश केल्यानंतर त्याने दरवाजा आतून बंद केला आणि निर्मला पंचाळ यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

तोंडात पायपुसणी कोंबली, गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न!

आरोपीने महिलेला घरातील स्वयंपाकघरात नेले. तेथे त्यांच्या तोंडात पायपुसणी कोंबून मारहाण केली आणि गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या झटापटीदरम्यान आरोपीने महिलेच्या नाकातील नथ काढली; मात्र झटापटीत ती खाली पडली. घरात सुरू असलेल्या या प्रकारामुळे भयभीत झालेल्या निर्मला पंचाळ यांनी अखेर आरडाओरड सुरू केली. त्यांच्या आवाजाने शेजारील महिला आणि युवक मदतीसाठी धावले.

महिलांनी दाखवले धाडस; पळणाऱ्या आरोपीला पकडले!

महिलेच्या मदतीसाठी नागरिक घराकडे धावत येत असल्याचे लक्षात येताच आरोपीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी दाखल झालेल्या महिलांनी धाडस दाखवत त्याला पकडले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. वृद्ध महिलेवर घरात घुसून हल्ला झाल्याच्या या घटनेने वार्ड क्रमांक ६ मधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संकटाच्या क्षणी मदतीसाठी धावून आलेल्या नागरिकांच्या तत्परतेची परिसरात चर्चा होत आहे. या प्रकरणी पीडित निर्मला पंचाळ यांच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलीस ठाण्यात शेख सोरभ शेख रहीम ऊर्फ शेरा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३३, २९६, ११५(२) आणि ३५१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास साखरखेर्डा पोलीस करीत आहेत.