सुशिक्षित बेरोजगारांना तारीख लक्षात ठेवा !पंडित दीनदयाल रोजगार मेळावा; खासगी नोकरीसाठी सुवर्णसंधी;
१२ मे रोजी बुलढाण्यात नामांकित कंपन्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती...
May 8, 2026, 15:56 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी तसेच STEP अंतर्गत अल्प मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, बुलढाणा आणि श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा रोजगार मेळावा दि. १२ मे २०२६ रोजी, मंगळवारी सकाळी ९.३० वाजता श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, पाळणा घर, बुलढाणा येथे पार पडणार आहे. मेळाव्यात विविध नामांकित उद्योग समूह सहभागी होणार असून त्यांनी अनेक रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केल्या आहेत.
मेळाव्यात वैभव एंटरप्रायजेस अंतर्गत अंकित पल्प मानसार, विशल्य प्रिंटमन नागपूर, संविजय इन्फ्रास्ट्रक्चर बुटीबोरी, अपेक्स नाईव्ह्स नागपूर, असरोफॅब मशिनरीज नागपूर तसेच विराज प्रोफाइल मुंबई आदी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. यावेळी प्राथमिक निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असून काही उमेदवारांना प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षणाची संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
१० वी, १२ वी, आयटीआय, पदवीधर तसेच STEP अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेले पुरुष व महिला उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एकापेक्षा अधिक पदांसाठी मुलाखत देण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
रोजगार इच्छुकांनी स्वखर्चाने उपस्थित राहून नाव नोंदणी करून कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधावा व रोजगाराच्या या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्री. ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक (०७२६२) २४२३४२ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.