ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे शेताला 'तलाव'चे रूप !
दुसऱ्यांदा पेरलेले सोयाबीन पाण्याखाली; दोषींवर कारवाई आणि नुकसानभरपाईची मागणी! शेतकरी नेते विनायक सरनाईक, नितीन राजपूत आक्रमक..
Jul 11, 2025, 17:51 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):तालुक्यातील अंत्रीकोळी शिवारातील शेतकऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराच्या निष्काळजी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.रस्त्याच्या कामात नाल्यांची व्यवस्था न केल्याने उभ्या पिकात पाणी साचले असून तलावाचे स्वरुप आले आहे. त्यामुळे, दुसऱ्यांदा पेरणी केलेले सोयाबीन पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणाची चाैकशी करून दाेषींवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.
शेतकऱ्यांनी विचारणा केल्यावर ठेकेदाराने "माझ्याकडे एकच काम आहे का?" असे उर्मट उत्तर दिल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. प्रभारी तहसीलदार गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांनी दोषींवर कारवाई, नुकसानभरपाई आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करत न्याय न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.