अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या ताेंडाला पुसली पाने; माेताळा तालुक्यातील अनेक गावांना वगळले; केवळ १२ गावांचाच केला समावेश; सत्ताधारी भाजपनेच दिले प्रशासनाला निवेदन...
Oct 16, 2025, 10:27 IST
माेताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा दावा राज्य शासन करीत असले तरी प्रत्यक्ष चित्र वेगळेच असल्याचे चित्र आहे. माेताळा तालुक्यातील अनेक गावांना अतिवृष्टीच्या मदतीतून वगळण्यात आल्याने थेट सत्ताधारी भाजपलाच निवेदन द्यावे लागले आहे.
सप्टेंबर महिन्यात माेताळा तालुक्यात माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. नदी, नाल्यांना पूर आल्याने अनेक शेतकऱ्यांची पिके खरडून गेली. तसेच अनेकांच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील जवळपास सर्वच गावांना फटका बसला असला तरी प्रशासनाने केवळ १२ गावातच नुकसान दाखविले आहे. वगळलेल्या सर्वच गावांचा समावेश करण्याची मागणी तालुका भाजपच्या वतीने तहसीलदार मोताळा यांना १५ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात नमूद आहे की, राज्य सरकारने नुकतीच पुर व अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा मोठा हात दिला आहे व त्यांची दिवाळी गोड केली आहे. जाहीर केलेल्या मदतीच्या यादीत बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्याचा समावेश झालेला आहे, मात्र तालुक्यातील फक्त बारा गावांचा समावेश करण्यात आलेला आहे .यामध्ये उबाळखेड, सोनबरड, नळकुंड, गुळभेली, शहापूर, राहेरा,दाभा, नाईक नगर, रोहिणखेड, वडगाव खंडोपंत, खामखेड व खडकी यांचा समावेश आहे. मात्र प्रत्यक्षात मोताळा तालुका मोठ्या प्रमाणात बाधित असून अनेक गावे मदतीपासून वंचित ठेवेलेली आहे. शासनाने फक्त जिरायत पिकाखालील ३३ टक्यांपेक्षा जास्त नुकसान असलेल्या शेतकर्यांना मदत जाहीर केली आहे. यामध्ये या बारा गावांतील बाधित क्षेत्र २ हजार २४१ हेक्टर आर, एकूण शेतकरी ३१८३ , खरडून गेलेले क्षेत्र ५१ हेक्टर आर, खरडून शेतकरी संख्या ८८, तर विहीर नुकसान ४६ दाखविली आहे.
मोताळा तालुक्यात माहे-सप्टेबर २०२५ मध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या हजारोंच्या घरामध्ये आहे. परंतु स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ पंचनामे न करता चार भिंतीच्या आतमध्ये बसून पंचनामे करून अहवाल पाठवलेला आहे.
मात्र 33 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान दाखवलेल्या शेतकऱ्यांचा सहानुभूती पूर्वक विचार होणे गरजेचे आहे. मोताळा तालुक्यात झालेले नुकसान हे भयावह असून दृश्य स्वरूपामध्ये झालेले पिकांचे नुकसान हे काही प्रमाणामध्ये कमी जास्त असू शकते परंतु पुरामुळे जमिनी नापिकी झाल्या आहेत व पिकांची उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात घटली असून शेतकऱ्यांना होणारे उत्पादन अतिशय कमी होणार आहे. पुरामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्याने येणाऱ्या उभी असलेली सोयाबीन, कपाशी,मका,तूर या पिकांचे ज्या शेतकऱ्यांना एकरी दहा क्विंटल चे उत्पादन होणार होते आता त्या शेतकऱ्यांना एकरी फक्त तीन ते चार क्विंटल उत्पादन होणार आहे.
त्यामुळे या नुकसानीची दाहकता ही अतिशय गंभीर आहे त्यामुळे या नुकसानीकडे शासन व प्रशासनाने सहानुभूती पूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. मोताळा तालुक्यातील बारा गावांच्या व्यतिरिक्त ज्या गावांमध्ये अतिवृष्टी व पुरपरिस्थितिने नुकसान झालेले आहे, त्या गावांत नुकसान ग्रस्त शेतकर्यांचे नुकसानीचे पुन्हा पंचनामे करण्याच्या सूचना स्थानिक पातळीवर देण्यात याव्यात व ज्यांची टक्केवारी ३३टक्यांपेक्षा कमी आहे अश्या शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत होणारी घट लक्षात घेऊन अतिवृष्टीची मदत जाहीर करावी अशी आग्रही मागणी निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करते वेळी भाजप तालुकाध्यक्ष सचिन शेळके पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गजानन घोंगडे , उमेश वाघ प्रदेश सदस्य युवा मोर्चा, श्रीकांत घाटे उपतालुकाध्यक्ष , दत्ता पाटील युवा मोर्चा तालुकाध्यक्ष ,दादाराव जुनारे गजानन पांडे प्रभाकर आढाव राजू सुरपाटणे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते