“डॉ. संपदा मुंडेंना न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही!”बुलढाण्यात वैद्यकीय संघटनांचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला माेर्चा !

 
३० ऑक्टोबर रोजी सकाळी जयस्तंभ चौकातून निघालेल्या या मोर्चात आयएमए, निमा, आयडीए, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, नर्सिंग, फार्मसी, फिजिओथेरपी, पॅथॉलॉजी, सेव्ह वसुंधरा, मॅग्मो आणि स्त्रीमुक्ती संघटना यांसह विविध वैद्यकीय क्षेत्रातील संस्थांचा सहभाग होता.
डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी.संबंधित प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे.
डॉ. मुंडे यांच्या कुटुंबीयास नोकरी व आर्थिक मदत द्यावी. महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ले व छळ रोखण्यासाठी हेल्थ प्रोटेक्शन अॅक्टमध्ये कठोर शिक्षेची तरतूद करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. संघटनांनी शासनाला तत्काळ प्रतिसाद देण्याचा अल्टिमेटम दिला असून, मागण्या न मानल्यास राज्यभर टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी सर्व वैद्यकीय अधिकारी काळ्या फिती लावून कामकाज करतील.
१ ते ६ नोव्हेंबरदरम्यान प्रशासकीय कामकाजावर बहिष्कार घातला जाईल, तर ७ ते १३ नोव्हेंबरदरम्यान ओपीडी सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. १४ नोव्हेंबरपासून आपत्कालीन सेवाही बंद करण्याचा इशारा वैद्यकीय संघटनांनी शासनाला दिला आहे. या आंदोलनामुळे आरोग्य यंत्रणा विस्कळीत होण्याची शक्यता असून, शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून डॉ. मुंडेंना न्याय मिळवून द्यावा, अशी सर्व संघटनांची एकमुखी मागणी आहे.