वाढदिवसाला बॅनर, पुष्पगुच्छ, इव्हेंट नको! १३ मे रोजी रविकांत तुपकर घराच्या अंगणातच कुटुंबासह करणार उपोषण..!

 शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती, पीकविमा,भावफरकासाठी सरकारचे वेधणार लक्ष! उपवास करून शहीद जवानांना वाहणार आदरांजली ...!
 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा १३ मे रोजी जन्मदिवस आहे. तूपकरांचा वाढदिवस दरवर्षी अतिशय साध्या पद्धतीने साजरा होतो. आपल्या क्रांतिकारी हेल्पलाईन सेंटरच्या कार्यालयात तुपकर कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत असतात.सगळ्यांना भेटत असतात. यंदा मात्र तुपकर आंदोलनात्मक पद्धत्तीने जन्मदिवस समर्पित करणार आहेत.ते चाहत्यांना भेटतील पण, कोणतेही बॅनर लावू नका, पुष्पगुच्छ आणू नका असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे. जन्मदिवसाच्या दिवशी १३ मे रोजी मंगळवारी सकाळी ९ वाजेपासून ते रात्री ९ वाजे पर्यंत रविकांत तुपकर घराच्या अंगणात सहकुटुंब अन्नत्याग करणार आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह इतर मागण्यांवर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात येणार आहे. पहेलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीयांचा मृत्यू झाला, त्यानंतर झालेल्या युद्धात भारतीय जवानांनी पराक्रम गाजवत पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले. मात्र यात देखील काही जवानांसह सीमेवरील गावातील काही नागरिकांचा मृत्यू झाला. शहीद भारतीय जवानांसह नागरिकांना आदरांजली वाहण्यासाठी देखील तुपकर व त्यांचे कुटुंबीय एक दिवशीय उपवास करणार आहेत..

   शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा वाढदिवस दरवर्षी अत्यंत साधेपणाने साजरा होतो. यंदाही कोणत्याही प्रकारचे पोस्टर्स, बॅनर्स न लावण्याचे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे. शेतकरी संकटात आहेत, दिवसाला १० शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत.
अशा परिस्थितीत निवडणुकीच्या आधी दिलेले कर्जमुक्तीचे आश्वासन शासनाने पाळावे. अजूनही ज्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला नाही त्यांच्या खात्यात त्वरित पिक विम्याची रक्कम जमा करावी.सोयाबीन-कापसाला भावफरक द्या, बँकानी शेतकऱ्यांच्या रकमेला लावलेले होल्ड काढा, बँकाची बळजबरी ची वसुली थांबवा,शेतीला मजबूत कंपाउंड यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाढदिवसाच्या दिवशी एकदिवसीय उपवास करणार असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले. तुपकर घराच्या अंगणातच कुटुंबासह बसून उपवास करणार असून, कार्यकर्त्यांनी भेटवस्तू, पुष्पगुच्छ न आणता आंदोलनला बळ दिले तर हीच माझ्यासाठी भेट आहे असे भावनिक आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे. तुपकर हे उपोषण स्थळीच कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध राहणार असून, भेटवस्तू, पुष्पगुच्छ सेलिब्रेशन करणार नाहीत असे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.