संयमाची परीक्षा पाहू नका, माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार! रविकांत तुपकरांचा इशारा; अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस उजाडला,

अन्नाचा कणही न घेतल्याने तुपकरांची तब्येत खालावली...

 

सिंदखेडराजा(बाळासाहेब भोसले:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सरकारने आमच्या संयमाची परीक्षा पाहू नये, आम्ही काही भिक मागत नाही आहोत..आम्ही आमचा हक्क मागतोय, घामाचे दाम मागतोय. ते जर तुम्हाला देता येत नसेल तर खुर्च्या खाली करा..अन्नत्याग आंदोलनामुळे माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल..शेतकऱ्यांनी कायदा हातात घेतला तर मग मात्र सरकारची भंबेरी उडेल असा इशारा रविकांत तुपकर यांनी राज्यसरकारला दिला आहे. रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे, पोटात अन्नाचा कणही न घेतल्याने त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे त्यांची तब्येत खालावली आहे...

 
पीक विम्याचा प्रश्न, सोयाबीन कापसाला दरवाढ, जंगली जनावरांपासून शेती पिकांचे रक्षण, अतिवृष्टीची नुकसान भरपाई यासह विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर ४ सप्टेंबर पासून अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. मातृतीर्थ सिंदखेडराजातील राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थानासमोर हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला समाजातील विविध घटकांचा जोरदार पाठिंबा मिळत आहे. तुपकर यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ काल ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. आता ८ सप्टेंबरला बैलगाड्या घेऊन समृद्धी महामार्गावर घुसण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलेला आहे.
बंदोबस्त वाढवला...
रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची हटके स्टाईल पाहता तुपकर कधी काय करतील याचा अंदाज नाही. पोलीस प्रशासनाला यांबद्दल चांगलेच माहीत आहे. त्यामुळे रविकांत तुपकर यांच्या आंदोलनस्थळासह समृध्दी महामार्ग परिसरात देखील पोलीस बंदोबस्त वाढवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.