पाहणी आणि पंचनामे सोबत करा! आ. श्वेताताई महाले यांच्या अधिकाऱ्यांना सूचना! आमदार पोहचल्या शेताच्या बांधावर, स्वतः केली हुमणीने बाधित शेताची पाहणी..
Jul 23, 2025, 17:38 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):हुमणी अळीच्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांचे पीक बळी पडत असल्याने चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेता महाले यांनी भालगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर आ. सौ. श्वेता महाले म्हणाल्या की,आता कोळपणीच्या टप्प्यातच सदर पिकावर हुमणी अळीचा जबरदस्त हल्ला झाल्याने पीक मुळासकट नष्ट होत आहे. ही अळी मुळाशी व खोडाशी हल्ला करून पीक नष्ट करत आहे त्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीची वेळ आली आहे.चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये समाधानकारक पाऊस पडल्यामुळे सोयाबीन चांगल्या प्रमाणात उगवले आहे परंतु या अळीच्या हल्ल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे कृषी विभागामार्फत या अळीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणचे ताबडतोब पंचनामे करून घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आपण शासन दरबारी केली आहे.
डवरणी, स्प्रिंकलर लावणे, औषधी फवारणी केली तरी सुद्धा अळी नियंत्रणात येत नाही आहे.तसेच शासन निर्णयात किंवा पिक विमा योजनेमध्ये किड रोगाने, अळीने पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळणे संदर्भात तरतुद नाही. अशा वेळेस निसर्गाच्या प्रकोपामुळे परेशान झालेल्या शेतकऱ्याला सरकारकडून मदतीचा हात मिळणे गरजेचे असून,या बाबतीत सरकारकडून निश्चितच योग्य पावले उचलली जातील याची आपल्याला खात्री आहे.असे आ. सौ श्वेता महाले यांनी बोलतांना सांगितले.
या हुमणी अळीमुळे किंवा कीड रोगामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करून विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासंदर्भात संबंधितांना आदेश देण्यात यावे अशी विनंती आ. सौ श्वेता महाले यांनी शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला केली.