"आवाज नको वाढवू डीजेवाल्या" ; एसपी कडासणेंचा डीजेवाल्यांना सज्जड दम ! म्हणाले परवानगी आवश्यक अन् आवाज मर्यादित ठेवा अन्यथा...
May 2, 2024, 13:10 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) सध्या लगीनसराई सुरू आहे, लग्न सोहळ्यात अनेकजण डिजे लावताना दिसत आहेत. अशातच डीजेच्या वाढत्या आवाजामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे दिसत आहे. तर काही ठिकाणी आक्षेपार्ह गाणे वाजवल्यामुळे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलीस विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. मर्यादेपेक्षा जास्त आवाज असला किंवा परवानगी नसली तर कठोर स्वरूपाची कारवाई करणार असल्याची माहिती एसपी सुनील कडासणे यांनी दिली. आज गुरूवार, २ मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली.
आतापर्यंत २२ डीजे धारकांवर कारवाई करण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार, ७५ टक्के डिसिमल पेक्षा जास्त आवाज असला तर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कायद्याचे पालन करून आनंद साजरा करावा. मानवी जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे एसपी सुनील कडासने म्हणाले. डीजे गाड्यांच्या मॉडिफिकेशन बाबत प्रतिबंध लावण्यासाठी आरटीओ विभागातून सूचना दिल्या जातात. त्यामुळे पोलीस विभाग तसेच आरटीओ विभागाद्वारे आता डीजे धारकांवर कडक वॉच वाचणार आहे. समारंभ, सोहळ्यात डीजेची परवानगी मिळवण्यासाठी जवळील पोलीस ठाण्यात अर्ज करावा लागेल.