जिल्ह्यातल्या ४ लाख ८० हजार ६१८ कुटुंबाची १०० रुपयांत दिवाळी! हे कसं ते बातमीत वाचा...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. त्यासाठीची लगभग देखील सुरू आहे. दरम्यान सरकारच्या वतीने राशन वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिवाळीत राज्य सरकार एक किराणा किट लाभार्थ्यांना देत आहे, "आनंदाचा शिधा" अस या उपक्रमाचं नाव आहे..
  याआधी गेल्यावर्षी दिवाळीत, त्यानंतर यंदा पाडवा आणि गौरी गणपतीच्या सणाला देखील याचे वितरण करण्यात आले होते. गेल्यावर्षी दिवाळी संपल्यानंतर देखील अनेकांना आनंदाचा शिधा न मिळाल्यामुळे टीकेची झोड उठली होती. यंदाही सरकार दिवाळीसाठी आनंदाचा शिधा वाटणार असले तरी वाटपाची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत असणार आहे, त्यामुळे दिवाळीत सर्व लाभार्थ्यांना तो दिवाळीत मिळण्याची शक्यता कमीच दिसते..
 
   आनंदाचा शिधा किटमध्ये अर्धा किलो रवा, अर्धा किलो चना डाळ,अर्धा किलो पोहे आणि साखर आणि पाम तेल प्रत्येकी १ किलो एवढे सामान असणार आहे. ही किट १०० रुपयांमध्ये लाभार्थ्यांना मिळणार आहे. मात्र असे असले तरी दिवाळी सण खरचं एवढ्यात भागणार आहे का असा सवालही उपस्थित केल्या जातोय. जिल्ह्यातल्या ४ लाख ८० हजार ६१८ कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाला एकूण वाटपाच्या ६५ टक्के किट प्राप्त झाल्या असून काही तालुक्यांत वितरण सुरू झाल्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले..