दिवाळीची सुरुवात फटाक्यांच्या आतषबाजीने नव्हे, तर शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन! सव येथील शिवप्रेमींचा आदर्शवत उपक्रम; छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक अन् महाआरती!

 गोपाल जवंजाळ, दिनेश शेळके यांच्या पुढाकाराचे कौतुक; सण साजरा करताना संस्कृती अन् इतिहासाचे स्मरण ठेवण्याचा दिला सुंदर संदेश...

 
 बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दिवाळी म्हटली की घराघरांत दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, लक्ष्मीपूजन आणि आनंदोत्सव... मात्र, बुलढाणा तालुक्यातील सव येथील शिवप्रेमींनी यंदाच्या दिवाळीला एक वेगळाच अर्थ दिला! दिवाळीच्या मंगलमय पर्वावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक आणि महाआरती करण्यात आली. शिवप्रेमी गोपाल जवंजाळ आणि दिनेश शेळके यांच्या पुढाकारातून पार पडलेल्या या उपक्रमाने सण-उत्सव साजरे करताना आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि महापुरुषांच्या विचारांचा विसर पडू नये, असा प्रेरणादायी संदेश दिला. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.

दीपावलीतील लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर सव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आले. शिवप्रेमी गोपाल जवंजाळ आणि दिनेश शेळके यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर गोपाल जवंजाळ आणि त्यांच्या पत्नी सौ. कोमल जवंजाळ यांच्या हस्ते शिवरायांची महाआरती करण्यात आली.

दिवाळीच्या आनंदोत्सवाला शिवविचारांची जोड!

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील पराक्रमी राजे नाहीत, तर स्वराज्य, स्वाभिमान, न्याय आणि लोककल्याणाचे प्रेरणास्थान आहेत. महाराजांच्या या विचारांचे स्मरण केवळ शिवजयंतीपुरते मर्यादित न ठेवता प्रत्येक सण-उत्सवातून व्हावे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.दिवाळीच्या दिवशी शिवरायांच्या चरणी अभिवादन करून त्यांच्या शौर्याला, पराक्रमाला आणि स्वराज्यनिष्ठेला वंदन करण्यात आले. धार्मिक उत्सवाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जाणिवेची जोड देण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरला आहे.आजच्या काळात सण-उत्सवांचे स्वरूप बदलत असताना सव येथील शिवप्रेमींनी एक सकारात्मक आदर्श घालून दिला आहे. दिवाळीच्या आनंदात आपल्या महापुरुषांचे स्मरण करणे, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, हीच या उपक्रमामागील भावना आहे.