शेतात जाण्याचा वाद पेटला; शेतकरी दाम्पत्याला शिवीगाळ करत कुऱ्हाडीने हल्ला, पती-पत्नी जखमी! मेरा बु. येथील धक्कादायक घटना...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन सुरेश सानप (वय ३२, व्यवसाय शेती, रा. अंढेरा) हे पत्नीसमवेत मोटार सुरू करण्यासाठी विहिरीकडे जात असताना विष्णू आसरूबा सानप तेथे आला. त्याने विहिरीवर तसेच आपल्या दिलेल्या शेतात जाण्यास विरोध करत गजानन सानप व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.
गजानन सानप हे समजावून सांगण्यासाठी गेले असता आरोपीने कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यावर व उजव्या खांद्यावर वार करून जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच त्यांच्या पत्नीलाही कुऱ्हाडीच्या दांड्याने तसेच चापट-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी गजानन सानप यांच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास अंढेरा पोलिस करीत आहेत.