जळगाव जामोद येथे दिशा बचत गट फेडरेशनची बैठक संपन्न! जयश्रीताई शेळके म्हणाल्या, जिल्हास्तरीय बचतगट प्रदर्शनीत सहभागी व्हा...

 

जळगाव जामोद( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्यावतीने बुलडाणा येथे ४ व ५ नोव्हेंबर रोजी आयोजित जिल्हास्तरीय महिला उद्योजक तथा बचतगट प्रदर्शनीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई शेळके यांनी केले.

येथील राजा भरतुहरिनाथ मंदिर, राजा रुपलाल महाराज सभागृहात ३१ ऑक्टोबर रोजी दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. बैठकीला काँग्रेसच्या जळगाव जामोद विधानसभा पक्षनेत्या स्वातीताई वाकेकर, काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधी ज्योतीताई ढोकणे, महिला काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस प्रतिभाताई रोठे, काँग्रेसच्या शहराध्यक्ष मीनाताई सातव, महिला काँग्रेसच्या सदस्य सुचिताताई खारोडे, आशाताई ताडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रारंभी महानायिकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.  पुढे बोलतांना जयश्रीताई शेळके म्हणाल्या, बुलडाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्रांगणात जिल्हास्तरीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्य आणि जिल्ह्यातील २०० वर स्टॉल लावण्यात येणार आहेत.  महिला बचतगटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ही मोठी संधी आहे. बचतगटांनी या संधीचा लाभ घ्यावा. 

बचतगट ही एक आर्थिक चळवळ आहे.  जिल्ह्यातील १४०० बचतगट दिशा फेडरेशनसोबत जुळलेले आहेत. बचतगटांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, अर्थसहाय्य, जाहिरात, बाजारपेठ उपलब्ध करण्याचे काम दिशा फेडरेशनकडून करण्यात येते. बचतगटांनी घेतलेल्या कर्जाचा उपयोग व्यवसाय उभारण्यासाठी करावा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. संचलन पल्लवी पाटील यांनी केले तर आभार गायत्री टिकार यांनी मानले. बैठकीला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.