वेळेवर बस न सोडले भोवले; चिखलीचे दोन वाहतूक नियंत्रक निलंबित..! आगार व्यवस्थापकांनी केली कारवाई...
Jan 3, 2025, 11:59 IST
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):गत काही वर्षांपासून चिखली आगाराने इसरुळ जाण्यासाठी रात्री मुक्कामी बससेवा सुरू केली आहे. ही बस रात्री आठ वाजता नित्यनेमाने जाते. त्यामुळे त्या मार्गावरील अनेकजण या बसवर अवलंबून राहतात आणि कामांचे नियोजन करतात. मात्र, १ जानेवारीला ही बस फलाटावर आलीच नाही. चौकशी केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शिवसेनेच्या संतोष भुतेकर यांनी आगार व्यवस्थापकाला धारेवर धरले. अखेर रात्री ११ वाजता ही बस सोडण्यात आली. प्रवासी मध्यरात्री घरी पोहोचले. विद्यार्थ्यांसह महिला, पुरुष व वयोवृद्धांची हेळसांड झाली. कर्तव्यात हलगर्जी केल्यामुळे आगार व्यवस्थापकांनी दोन नियंत्रकांनी तडकाफडकी निलंबित केले.
नववर्षाच्या सुरुवातीलाच जबाबदार वाहतूक नियंत्रकांना आपला ढिसाळ कारभार भोवला. १ जानेवारीच्या संध्याकाळी चिखली-इसरूळ मार्गावरील बस नियोजित वेळेपेक्षा उशीरा लावण्यात आल्याने प्रवासी अस्वस्थ झाले. बऱ्याच वेळापासून बसस्थानकात ताळकळत उभे राहूनही गाडी लागत नाही. याबाबत युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी आगार प्रशासनाकडे तक्रार केली. त्यांनी या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई न केल्यास केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अनेक प्रवासी आपापल्या घरी जाण्यासाठी बसस्थानकात उभे होते. मात्र, वाहतूक नियंत्रकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवासी अडचणीत आले. आगार व्यवस्थापक संतोष जोगदंडे यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. या प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी आम्ही कठोर पावले उचलली आहेत. दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही जोगदंडे यांनी सांगितले.