वनरक्षकच झाला भक्षक? चिखली तालुक्यातील अंचरवाडी शिवारात मौल्यवान वृक्षांची कत्तल! वनरक्षकाच्या आदेशावरूनच अवैध जंगलतोड झाल्याचा गंभीर आरोप; तोडलेल्या झाडांचे लाकूड गेले कुठे?
छायाचित्रांसह वरिष्ठांकडे तक्रार; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!
या संदर्भात ३० ऑक्टोबर २०२६ रोजी बुलढाणा वनविभागाच्या उपवनसंरक्षकांकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे. तक्रारीसोबत वृक्षतोडीची छायाचित्रे आणि इतर संबंधित पुरावेही जोडण्यात आले आहेत. त्यामुळे आता वनविभाग या गंभीर आरोपांची चौकशी करून नेमकी काय कारवाई करतो, याकडे लक्ष लागले आहे.
अंचरवाडी बीट अंतर्गत वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. ही वृक्षतोड संबंधित वनरक्षकाच्या आदेशाने, संमतीने किंवा त्याच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागातून झाली आहे का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. जंगलातील झाडे तोडून त्यांचे लाकूड वाहून नेण्यात आले असावे, तसेच त्याची साठवणूक किंवा विक्री करण्यात आली असावी, असा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.
वृक्षतोडीचे लाकूड गेले कुठे? वाहतूक कुणाच्या परवानगीने?
या प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जंगलातून तोडण्यात आलेल्या झाडांचे पुढे नेमके काय झाले? तक्रारीनुसार, वृक्षतोडीसाठी वापरण्यात आलेली साधने, वाहने, तोडलेल्या झाडांची संख्या आणि प्रजाती, लाकडाची वाहतूक, साठवणूक तसेच संभाव्य विक्री या सर्व बाबींची तपासणी होणे आवश्यक आहे. तोडलेल्या झाडांची मोजणी करून वनसंपत्तीचे किती नुकसान झाले, याचा अधिकृत पंचनामा करण्यात यावा. तसेच संबंधित वनरक्षकाने आपल्या पदाचा गैरवापर केला आहे का, त्याने कोणाला आदेश दिले किंवा कोणाच्या सहकार्याने ही वृक्षतोड झाली, याचाही शोध घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
छायाचित्रांसह पुरावे सादर; जंगलातील तोडलेल्या वृक्षांचे बुंधे समोर!
तक्रारदारांनी आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ छायाचित्रे जोडली आहेत. या छायाचित्रांमध्ये जंगल परिसरातील तोडलेल्या वृक्षांचे बुंधे, झुडपे आणि वृक्षतोड झाल्याचे दर्शविणाऱ्या जागा दिसून येतात. काही छायाचित्रांवर ठिकाणासंबंधी जीपीएस माहितीही नोंदविलेली आहे. त्यामुळे या छायाचित्रांची प्रत्यक्ष घटनास्थळाशी पडताळणी करून वृक्षतोडीची व्याप्ती निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, वृक्षतोडीमुळे वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पर्यावरणावरही विपरीत परिणाम झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नुकसानभरपाई वसूल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार; वनरक्षकाच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी!
या प्रकरणाची चौकशी केवळ कागदोपत्री न करता प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार मोतीसिंग परिहार यांनी केली आहे. तक्रारीच्या प्रती उपवनसंरक्षक बुलढाणा, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, पालकमंत्री तसेच मुख्य वनसंरक्षक अमरावती यांच्याकडेही पाठविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
संबंधित वनरक्षक आणि चौकशीत दोषी आढळणाऱ्या इतर व्यक्तींविरुद्ध वनकायद्यानुसार कठोर कारवाई करावी, तोडलेल्या वृक्षांचे नुकसान निश्चित करावे आणि आवश्यक असल्यास नुकसानभरपाई वसूल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.