पिंप्री माळेगावात दूषित पाण्यामुळे अतिसाराची साथ; आरोग्य पथक दाखल,८० ग्रामस्थांवर उपचार सुरू

 
 संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दूषित पाणी पिल्यामुळे पिंप्री माळेगाव येथे डायरीयाची लागण झाल्याने ८० हून अधिक ग्रामस्थ त्रस्त आहेत. ५० रुग्णांनी स्वतःच खासगी रुग्णालयात औषधोपचार करवून घेतले. तर २५ रुग्णांना वानखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामस्थ जुलाब, उलट्यांमुळे त्रस्त होते. परंतु आरोग्य प्रशासनाला याची काहीच खबर नव्हती. रुग्णसंख्या वाढत गेल्यानंतर जाग आलेले आरोग्य पथक गावात पोहोचले.
पिंप्री माळेगाव हे दोन हजार लोकसंख्येचे गाव आहे. १४० गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी गावातील टाकीत आणण्यात आले आहे. सरपंच शांताराम चिकटे व सहकाऱ्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून टाकीपर्यंत पाणी आणण्याची व्यवस्था केली.
परंतु कमी दाबामुळे हे टाकीत पाणी पोहोचू शकले नाही. त्यामुळे नाईलाजाने पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरीत १४० गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी टाकावे लागले. तेथून गावकरी पाणी भरून पिण्यासाठी वापरत होते.
त्यातच विहिरीलगतच सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्याचे पाणी विहिरीत झिरपत होते.
तसेच १४० गाव पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइनही लिकेज होती. दूषित पाण्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून नागरिकांना पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत गेली.
वरवट बकाल येथील दोन डॉक्टरांच्या खासगी रुग्णालयात ५० रुग्णांनी रुग्णावर उपचार केले. हे रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गावातील पाण्याऐवजी इतर ठिकाणाहून
पाणी वापरत आहेत. तर दुसरीकडे विहिरीचे दूषित पाणी लोक पित असल्याने आणखी २५ हून अधिक रुग्णांना डायरीयाची लागण झाली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत मारोडे यांच्यासह पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कड, डॉ. दाणे, साथरोग आरोग्य सहायक अभिजीत पाटील, आरोग्य सेवक घोरसडे, बारबुधे, इंगळे, खोडके हे गावात दाखल झाले. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाहणी करून ग्रामपंचायत प्रशासनाला विहिरीचा परिसर स्वच्छ करून ब्लिचिंग पावडरचा नियमित वापर करण्याच्या सूचना दिल्या.
कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी
विहिरीत सांडपाण्याच्या नाल्याचे पाणी झिरपत होते. तसेच लिकेज असलेल्या जलवाहिनीतही हेच दूषित पाणी जात होते. या जलवाहिनीचे पाणी विहिरीत टाकले जात होते. त्यामुळे ही साथ पसरली. त्यावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.