शंभू शंकराच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर आग्या मोहोळाचा हल्ला! १०० –१२५ भाविकांना मधमाशा डसल्या...पिंपळगाव लेंडी येथील घटना
Feb 27, 2025, 09:52 IST
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) महाशिवरात्रि निमित्त श्री क्षेत्र निर्मळेश्वर संस्थान पिंपळगाव लेंडी येथे भव्य यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या उत्सवात काल, महाशिवरात्री निमित्त मोठ्या प्रमाणात भाविक आले होते. या ठिकाणी आग्या मोहोळाच्या मधमाश्यांनी भाविकांवर अचानक हल्ला केला. यामुळे एकच धांदल उडाली..यात १०० ते १२५ भाविकांना मधमाशांनी चावा घेतला आहे. यात प्रल्हाद रंदवे (७०) आणि त्यांच्या पत्नी सुशीला रंदवे (६५) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
महाशिवरात्रीनिमित्त पिंपळगाव लेंडी येथे यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. याच यात्रेत एका झाडाच्या आग्यामोहळाने भाविकांवर अचानक हल्ला चढवला. यामुळे एकच धांदल उडाली. याचवेळी रस्त्यावरील एका टिप्पर मध्ये गजू गायके, अविनाश गायके आणि धूर करून मधमाशा पांगवण्यासाठी पुढाकार घेतला. ज्ञानेश्वर तिकटे , बंडू गायके, सुभाष गायके, शिवाजी लबडे, गजू गायके, नंदकिशोर तिकटे आदींनी कचरा पेटवून धूर केला आणि भाविकांच्या अंगावरील मधमाशा पांगवल्या. या घटनेतील काही जखमींना जालना येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असून काहींवर किनगाव राजा येथे उपचार करण्यात आले..