ढगफुटी,पुरात पिके वाहून गेल्यानंतरही जिल्ह्याची सरासरी आणेवारी ५२ पैसे, प्रशासनाने चाेळले शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ ; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी ठरू शकते अडचणीची :

तब्बल ८३२ गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा जास्त तर ५८८ गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी... 

 
 बुलढाणा(अक्षय थिगळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी, ढगफुटी, पूर आदीमुळे खरीप हंगामातील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकीकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा असताना प्रशासनाने १ ऑक्टाेबर राेजी जाहीर केलेल्या नजरअंदाज पैसेवारीत जिल्ह्याची सरासरी ही ५२ पैसे काढली आहे. याचा अर्थ खरीप हंगामात जिल्ह्यातील पिकांची स्थिती चांगली आहे असा हाेताे. त्यामुळे, येणाऱ्या काळात जिल्ह्याला मदत मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा आणेवारीचा पहिला टप्पा असून अंतिम आणेवारीत यामध्ये बदल हाेण्याची शक्यता आहे. पण आता पाउस किंवा इतर संकटे नसताना त्यामध्ये फारसा फरक पडणार नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील तब्बल ८३२ गावांची आणेवारी ही ५० पैशांपेक्षा जास्त काढण्यात आली आहे. 

यंदाच्या सन २०२५-२६ च्या खरीप हंगामातील जिल्ह्यातील एकूण १ हजार ४२० गावातील नजर अंदाज पैसेवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. त्यानुसार सरासरी नजर अंदाज पैसेवारी ५२ पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण १४२० गावे असून ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या ५८८ आहे. तर ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावांची संख्या ही ८३२ आहे.

जिल्हा प्रशासनाने ५० पैसेपेक्षा जास्त व कमी पैसेवारी असलेल्या तालुकानिहाय गावांची संख्या जाहीर केली आहे. त्यानुसार ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या बुलढाणा तालुक्यातील ९८ गावाची सरासरी पैसेवारी ५४ पैसे, देऊळगाव राजा तालुक्यात ६४ गावाची सरासरी पैसेवारी ५२ पैसे, सिंदखेड राजा तालुक्यात ११४ गावाची सरासरी पैसेवारी ५५ पैसे, मोताळा तालुक्यात १२० गावाची सरासरी पैसेवारी ५६ पैसे, नांदुरा तालुक्यात ११२ गावाची सरासरी पैसेवारी ५७ पैसे, खामगांव तालुक्यात १४६ गावाची सरासरी पैसेवारी ५९ पैसे, शेगांव तालुक्यात ७३ गावाची सरासरी पैसेवारी ५३ पैसे, संग्रामपुर तालुक्यात १०५ गावाची ५७ पैसे इतकी सरासरी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.तसेच ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या चिखली तालुक्यातील १४४ गावाची सरासरी पैसेवारी ४९ पैसे, मेहकर तालुक्यात १६१ गावाची सरासरी पैसेवारी ४६ पैसे, लोणार तालुक्यात ९१ गावाची सरासरी पैसेवारी ४५ पैसे, मलकापूर तालुक्यात ७३ गावाची सरासरी पैसेवारी ४६ पैसे, जळगाव जामोद तालुक्यात ११९ गावाची ४९ पैसे इतकी सरासरी पैसेवारी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.