उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर; बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा घेतला आढावा;

 शेतकऱ्यांना दिली मदतीची हमी; जिल्ह्यातील कोलारी, खडकी खामखेड, रोहिणखेड, टाकळी येथे केली पाहणी...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पावसात पडलेला खंड आणि प्रतिकूल हवामानामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत बळीराजाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आले.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा दिलासा देतानाच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कोलारी आणि मोताळा तालुक्यातील खडकी खामखेड, रोहिणखेड व टाकळी येथे भेट देऊन पाहणी केली आणि बळीराजाला धीर दिला. 

उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, पीकाचे नुकसान याविषयी माहिती घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी सोयाबीनसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. काही शेतांमध्ये १०० टक्के नुकसान झाले असून शेंगांमध्ये दाणे भरले नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली.

पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आले असून, पंचनाम्यांची कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करत आहेत. शेतकऱ्यांची पीक विमा व शासकीय मदतीची मागणी विचारात घेऊन दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर योग्य ती मदत देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’सह राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे. सद्यस्थितीतही केंद्र शासनाकडून राज्याला आवश्यक ती भरीव मदत मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

संकटाच्या काळात बळीराजाने टोकाचे पाऊल उचलू नये. अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले. एका शेतकऱ्याने आपल्या मुलाच्या शिक्षणाबाबतची अडचण मांडल्यानंतर त्यांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, कामगार मंत्री आकाश फुंडकर, कृषी, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार संजय गायकवाड, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.