स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पुन्हा धार; २५ जुलैला सिंदखेडराजात जनसंकल्प मेळावा! वामनराव चटप म्हणाले,२०२७ च्या डिसेंबरपर्यंत वेगळा विदर्भ घेणारच, दोन पिढ्या खर्ची झाल्यात माघार नाही म्हणाले..

 
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर २५ जुलै रोजी सिंदखेडराजा येथील मातृतीर्थ परिसरात जनसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते वामनराव चटप यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

यापूर्वी स्थानिक विश्रामगृहात समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीला पश्चिम विदर्भातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत चटप यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीची भूमिका ठामपणे मांडली.

नागपूर करारानंतरही विदर्भाला विकासाच्या बाबतीत अपेक्षित न्याय मिळाला नसल्याचा दावा करत त्यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांवर टीका केली. स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत वेळोवेळी आश्वासने देण्यात आली; मात्र ती प्रत्यक्षात पूर्ण करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

"दोन पिढ्या या चळवळीसाठी खर्च झाल्या आहेत. आता माघार घेण्याचा प्रश्नच नाही. २०२७ अखेरपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठीचा लढा अधिक तीव्र करण्यात येईल," असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

विदर्भाच्या विकासासंदर्भात बोलताना चटप यांनी राज्यातील इतर भागांच्या तुलनेत विदर्भातील औद्योगिक आणि आर्थिक विकास अपेक्षित गतीने झालेला नसल्याचे सांगितले. विकासातील या असमतोलामुळे शेतकरी आत्महत्या, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि लोकसंख्येतील घट यांसारखे गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. विदर्भातील विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी स्वतंत्र राज्य हा प्रभावी पर्याय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नक्षलवादाच्या मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी विदर्भातील काही भागांमध्ये असंतोष आणि विकासातील तफावत असल्याचे मान्य केले. मात्र स्वतंत्र विदर्भ चळवळीचा नक्षलवादी विचारसरणीशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत या चळवळीला लोकशाही मार्गानेच पुढे नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, २५ जुलै रोजी मातृतीर्थ परिसरात होणाऱ्या जनसंकल्प मेळाव्यात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसंदर्भातील पुढील आंदोलनाची दिशा आणि आगामी कृती आराखडा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.