ठरल! थोड्याच वेळात बुलडाण्यात २५ पैकी २४ जणांवर सामूहिक अंत्यसंस्कार; १ मृतदेहावर आज अंत्यसंस्कार नाही, कारण....! 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काल मध्यरात्री सिंदखेडराजा तालुक्यातील समृध्दी महामार्गावर झालेल्या बसच्या अपघातात २५ जणांना जळून कोळसा झाला होता. सगळ्या मृतकांची नावे समोर आली असली कोणता मृतदेह कुणाचा हे ओळखणे कठीण आहे. फॉरेन्सिक टीमने २४ तास केले तरी सगळ्यांची डीएनए चाचणी करून मृतदेह कुणाचा हे कळायला कमीतकमी पाच दिवस लागतील. मात्र ३ दिवसांपेक्षा अधिक वेळ या अवस्थेतील मृतदेह ठेवणे कठीण आहे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी मृतदेह ताब्यात देताना येणाऱ्या अडचणसंदर्भात नातेवाईकांशी चर्चा केली. सर्वांनी मिळून बुलडाण्यातच सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचे निश्चीत केले आहे. त्यामुळे आज, सकाळी साडेनऊवाजता २५ पैकी २४ जणांवर बुलडाणा शहरातील त्रिशरण चौक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
२५ पैकी १ मृतदेह हा नागपूर येथील झोया या मुस्लिम तरुणीचा आहे. रात्री उशिरा तिचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात पोहचले. आम्हाला मृतदेह दफन करायचा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार श्वेताताई महाले यांनी रात्री २ पर्यंत झोयाच्या नातेवाईकांशी चर्चा केली. आम्हाला आमच्या मुलीचा मृतदेह ओळखता येईल असे तिचे नातेवाईक म्हणाले. २५ पैकी १ मृतदेहाचा चेहरा आणि शरीराची ठेवण पाहून तो मृतदेह झोयाचा असल्याचे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे होते. त्यामुळे झोयाच्या नातेवाईकांनी दावा केलेला मृतदेह सोडून उर्वरित २४ जणांवर आज अंत्यविधी होणार आहे. "त्या" मृतदेहाची डीएनए चाचणी केल्यानंतर तो मृतदेह झोयाचाच असल्याचे निश्चित झाल्यावर तो तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल. मात्र तसे निष्पन्न न झाल्यास त्यावर सुद्धा विधिवत अंत्यसंस्कार करण्यात येईल असे मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने निश्चीत करण्यात आले आहे.
   सध्या जिल्हा रुग्णालयात मृतकांचे नातेवाईक जमलेले आहेत. प्रशासनाच्या वतीने ८ ते १० सजवलेले स्वर्गरथ तैनात करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयातून ही अंत्ययात्रा निघणार आहे. रात्री अडीच पर्यंत जिल्हा रुग्णालयात ठाण मांडून बसलेले मंत्री गिरीश महाजन आज सकाळीच पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल झालेले आहेत. जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी अंत्यसंस्काराची तयारी करत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील मात्र एवढे होऊनही अजून पोहचलेले नाहीत. काल ते फक्त फेरफटका मारून गेले होते. दुसरीकडे गिरीश महाजन कालपासून बुलडाण्यात आहेत.