कर्जमुक्ती आंदोलन अपडेट!
गावागावात पेटला शेतकऱ्यांचा एल्गार; फसव्या कर्जमाफीच्या जी.आर.च्या होळ्यांनी सरकारविरोधात संतापाचा उद्रेक!
वाशीम जिल्ह्यातील अडोळी येथे शेतकऱ्यांचा संताप इतका तीव्र झाला की आंदोलनाला पाठिंबा देत एका शेतकऱ्याने स्वतःची दुचाकी पेटवून सरकारच्या निष्क्रियतेविरोधात रोष व्यक्त केला. तर हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे शेतकऱ्यांनी फसव्या जी.आर.ची होळी करत सरसकट कर्जमुक्तीची जोरदार मागणी केली.
धनगरवाडी येथील आंदोलनात सरपंच विनोद विरकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश खडसे यांच्यासह गावातील असंख्य शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी “कर्जमाफी नाही तर सरकारला माफी नाही”, “शेतकरी वाचवा, शेती वाचवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले, “शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही कर्जमाफी नसून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे. लाखो शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवणारा हा जी.आर. आम्ही कदापिही स्वीकारणार नाही. आज गावागावात जी.आर.च्या होळ्या पेटल्या आहेत, उद्या महाराष्ट्रभर सरकारविरोधात संघर्षाची ज्वाला भडकणार आहे. सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही.”
तुपकर पुढे म्हणाले, “शेतकरी आता जागा झाला आहे. आत्महत्या, कर्जबाजारीपणा आणि दुष्काळाच्या संकटात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम सरकार करत आहे. जर शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक गाव संघर्षाचे केंद्र बनेल आणि सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.”
अन्नत्याग आंदोलनाला राज्यभरातून वाढता पाठिंबा मिळत असून शेतकरी, सामाजिक संघटना, युवक आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनाच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. गावागावात पेटलेली ही ठिणगी आता व्यापक जनआक्रोशात रूपांतरित होत असून सरकारने वेळीच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा, कर्जबाजारी शेतकऱ्यांना न्याय आणि शेतीला जगण्याची हमी मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार आहे. आता शेतकरी मागे हटणार नाही. हक्क मिळेपर्यंत लढा… आणि लढाच!