खरीपाच्या उंबरठ्यावर बुलढाण्यात डीएपीचा 'वनवास', लिंकिंगच्या जाळ्यात शेतकरी भरडला..!
May 25, 2026, 08:47 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पेरणीचे दिवस जवळ आले तरी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कपाळावर आठ्यांचे जाळे आहे. कारण आहे – डीएपी खताचा बाजारातून अचानक गायब झालेला साठा. खत कंपन्यांच्या 'लिंकिंग' धोरणामुळे शेतकरी अक्षरशः जेरीस आला असून, कृषी विभाग मात्र मूग गिळून गप्प बसल्याचे चित्र आहे.
'डीएपी पाहिजे? मग हेही घ्या!' – लिंकिंगचा फंडा.
जिल्ह्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांवर डीएपी खताची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना धक्कादायक अनुभव येत आहे. "एक डीएपीची बॅग हवी असेल तर सोबत दोन नॅनो युरिया किंवा महागडे कीटकनाशक घ्यावेच लागेल," अशी अघोषित अट घातली जात आहे. याला 'लिंकिंग' म्हणतात. गरज नसलेल्या उत्पादनांसाठी हजारो रुपये मोजावे लागत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
कृत्रिम टंचाईचा संशय
सोयाबीन व कापसाच्या पेरणीसाठी डीएपी अत्यावश्यक आहे. हंगामाच्या तोंडावरच डीएपीचा तुटवडा निर्माण होणे हा निव्वळ योगायोग नसून 'कृत्रिम टंचाई' असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. जास्त नफा कमावण्यासाठी कंपन्या व विक्रेत्यांची ही साखळीच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
खतांचा पुरेसा साठा व योग्य दरात वितरण करण्याची जबाबदारी जिल्हा कृषी अधिकारी व गुणवत्ता नियंत्रण विभागाची आहे. मात्र बाजारात उघडपणे लिंकिंग सुरू असताना कारवाई होत नाही, याबद्दल शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. "भरारी पथके फक्त कागदावर आहेत का?" असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.
शेतकरी संघटनांची आक्रमक भूमिका
लिंकिंग प्रकार तात्काळ थांबवावा, डीएपीचा मुबलक साठा उपलब्ध करावा व दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.