डेंजर अलर्ट! पुढचा आठवडा ‘तापदायक’; बुलढाणा जिल्ह्यात उष्णतेची लाट! "ही" काळजी घ्या, नाहीतर लागेल कार्यक्रम....

 
 बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या काही दिवसांपासून बदलत्या हवामानामुळे नागरिकांना दिलासा मिळत असतानाच आता पुन्हा एकदा उन्हाचा चटका तीव्र होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आगामी आठवडाभर जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून तापमानाचा पारा थेट ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणानंतर आता थेट सूर्यकिरणांचा प्रभाव वाढत असून तापमानात सुमारे २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या ४२ अंशांच्या आसपास असलेले तापमान येत्या काही दिवसांत ४३ ते ४५ अंशांदरम्यान स्थिरावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत उष्ण वारे वाहणार असल्याने उकाड्याची तीव्रता अधिक जाणवणार आहे.
दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. दुपारी १२ ते ३ या कालावधीत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे सांगण्यात आले आहे. बाहेर जाताना डोक्याचे संरक्षण करण्यासाठी रुमाल, दुपट्टा किंवा छत्रीचा वापर करावा, तसेच डोळ्यांसाठी गॉगल्स वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचे आवाहन करण्यात आले असून दुपारच्या वेळी चहा, कॉफी, मद्य व शीतपेये टाळण्याचा सल्ला दिला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पाळीव प्राण्यांना कडक उन्हात बाहेर नेणे टाळावे व त्यांना हवेशीर जागेत ठेवावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उष्णतेच्या या वाढत्या लाटेमुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही, तर आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.