अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; ३०६ वाहनांवर कारवाई, ४.२६ लाखांचा दंड विशेष मोहिमेमुळे एसटीच्या महसुलात तब्बल ७३.९४ लाखांची वाढ

 
 बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी राबविण्यात आलेल्या संयुक्त विशेष मोहिमेत ३०६ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ४ लाख २६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) महसुलात तब्बल ७३ लाख ९४ हजार ४७३ रुपयांची वाढ झाल्याची माहिती बुलढाणा विभागाचे सुरक्षा व दक्षता अधिकारी जयंत कांडलकर यांनी दिली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या निर्देशानुसार ५ ते १५ जूनदरम्यान जिल्हाभर ही विशेष मोहीम राबविण्यात आली.

जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.

मोहीमेदरम्यान बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या इको, क्रुझर, मॅजिक, मॅक्झिमो तसेच ट्रॅव्हल्स वाहनांची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून दंड आकारण्यात आला.

या कारवाईत पोलीस विभागाने २ लाख ८ हजार ५०० रुपये, तर आरटीओ विभागाने २ लाख १८ हजार रुपये असा एकूण ४ लाख २६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. अवैध प्रवासी वाहतुकीविरोधातील ही मोहीम भविष्यातही अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सुरक्षा व दक्षता विभागाच्या मते, या कारवाईमुळे अवैध वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात अंकुश बसला असून एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत आणि महसुलातही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे अधिकृत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होत आहे.