अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात धडक मोहीम; एस.टी. स्थानकांच्या २०० मीटर परिसरात ‘नो पार्किंग’! पोलीस-आरटीओची संयुक्त कारवाई; ११७ वाहनांवर कडक कारवाई; १५ जूनपर्यंत विशेष तपासणी मोहीम...
Jun 11, 2026, 20:35 IST
अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एस.टी. महामंडळाच्या उत्पन्नात मोठी घट होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने बसस्थानक परिसरातील २०० मीटर क्षेत्रात अवैध प्रवासी वाहतूक, प्रवासी चढ-उतार आणि बेकायदेशीर पार्किंग रोखण्यासाठी ही मोहीम राबविली जात आहे.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या विषयाची गंभीर दखल घेत मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा डॉ. प्रियंका नारनवरे यांना राज्यभर कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार सर्व विभागांना तातडीने विशेष मोहीम राबविण्याचे आदेश जारी करण्यात आले.
बुलढाणा जिल्ह्यात ५ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येत असून, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना बसस्थानक परिसरात विशेष तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागीय सुरक्षा व दक्षता अधिकारी जयंत कांडलकर यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पथके सातत्याने कारवाई करत आहेत.
बसस्थानकांवर विशेष लक्ष : बुलढाणा विभागातील बुलढाणा, धाड, चिखली, देऊळगाव राजा, अमडापूर, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, खामगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा, जळगाव जामोद आणि शेगाव येथील प्रमुख बसस्थानकांच्या २०० मीटर परिघात विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एस.टी. महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मंत्री महोदय आणि मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी यांच्या निर्देशानुसार पोलीस प्रशासन व आरटीओच्या सहकार्याने जिल्ह्यात व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत ११७ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, पुढील काळातही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू राहील, असे सुरक्षा व दक्षता अधिकारी जयंत कांडलकर यांनी सांगितले.
अवैध वाहतुकीला आळा घालून एस.टी. सेवेचे उत्पन्न वाढविणे, प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आणि बसस्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.