कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; डोणगावच्या दोन मित्रांचा जागीच मृत्यू...

 
 डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मुंबई-नागपूर राज्य महामार्गावर नागापूरजवळ झालेल्या भीषण अपघातात डोणगाव येथील दोन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना २ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ७.४५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने डोणगाव परिसरावर शोककळा पसरली असून, ३ सप्टेंबर रोजी दुपारी साडेदोन वाजता दोन्ही मित्रांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीसाठी असंख्य नागरिकांची गर्दी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, डोणगाव येथील लक्ष्मीनगर परिसरातील रहिवासी शेख साहिल शेख जफर आणि शेख शाकिब शेख शकील कुरेशी हे दोघे मित्र २ सप्टेंबरच्या रात्री मोटारसायकल क्रमांक टीएन ०१ ईजी १४७६ वरून मेहकरकडे जात होते.

दरम्यान, नागापूरसमोरील पुलाजवळ काही कारणास्तव त्यांची मोटारसायकल थांबलेली असताना मेहकरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या एनएल ०१ एससी ३९८२क्रमांकाच्या कंटेनरने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही मित्र रस्त्याच्या खाली फेकले गेले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मेहकरकडून डोणगावकडे येणारे अमोल धोटे व त्यांच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रस्त्याखाली पडलेल्या दोन्ही जखमींना बाहेर काढून मदत करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, या अपघातात शेख साहिल आणि शेख शाकिब या दोन्ही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दोन्ही मित्रांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर ३ सप्टेंबर रोजी दुपारी साडेदोन वाजताच्या सुमारास डोणगाव येथे अंत्यविधी करण्यात आला. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते. दोन्ही तरुणांच्या अकाली निधनामुळे डोणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.