ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी बुलढाण्यात काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन; हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात रास्तारोको, कार्यकर्ते पोलिसांशी भिडले!
राहुल गांधींना कथित गैरवर्तनाच्या निषेधार्थ आंदोलन; टायर पेटवण्याचा प्रयत्न, सपकाळांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिल्लीसह देशातील विविध भागांत काँग्रेस आणि विरोधी पक्षांचे आंदोलन सुरू आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांना दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. काँग्रेसने या कारवाईवर आक्षेप घेतला असून, राहुल गांधी यांच्याशी पोलिसांनी कथित गैरवर्तन केल्याचा आरोपही पक्षाकडून करण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. यावेळी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आक्षेप आणि राहुल गांधींना दिलेल्या कथित गैरवर्तनाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी रास्तारोको केल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. वातावरण तापले असतानाच एका कार्यकर्त्याने टायर पेटवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला.
कार्यकर्ते-पोलिसांमध्ये झटापट
टायर पेटवण्याच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाल्याचे आंदोलनस्थळी पाहायला मिळाले. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना हटवण्यास सुरुवात केली.यानंतर पोलिसांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सपकाळ यांना बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात नेऊन डिटेन करण्यात आले.
दरम्यान, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेसने देशभर आंदोलन तीव्र केले आहे. दिल्लीतील आंदोलनात राहुल गांधी आणि इतर विरोधी नेत्यांना ताब्यात घेण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे दिसत आहे. काँग्रेसकडून निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रियेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत; मात्र निवडणूक आयोग आणि भाजपकडून काँग्रेसच्या आरोपांना विरोध करण्यात आला आहे. बुलढाण्यातील आंदोलनामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, काँग्रेसने प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून आपली भूमिका आक्रमकपणे मांडल्याचे या आंदोलनातून स्पष्ट झाले.