घोटाळा..!खोटे ना–हरकत प्रमाणपत्र तयार करून सरकारची फसवणूक; मोताळा नगराध्यक्षांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल....
Jun 30, 2025, 08:12 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोताळा नगरपंचायत कार्यालयातील खोटे ना हरकत प्रमाणपत्र आणि ठराव तयार करून तब्बल दहा लाखांहून अधिक शुल्क बुडवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नगराध्यक्ष माधुरी देशमुख, नगरसेवक अमोल देशमुख यांच्यासह पाच जणांविरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लु (वय ३९, रा. बोराखेडी) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अमोल शिवाजीराव देशमुख (नगरसेवक, मोताळा), महेश दिलीप सहाणे (बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, सन पॉवर इंडिया व्हेंचर्स प्रा. लि., मोताळा कॅम्प), शांताराम सुपडा लोखंडे (रा़. रुईखेडा, ता. मुक्ताईनगर), माधुरी पुरुषोत्तम देशमुख (नगराध्यक्ष, मोताळा) आणि सुनिल ओंकार मिरकुटे (आवक-जावक लिपिक, नगरपंचायत मोताळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घटना ११ एप्रिल २०२३ ते १८ एप्रिल २०२३ दरम्यान घडली. या काळात वरील आरोपींनी संगनमत करून मोताळा नगरपंचायतीच्या कार्यालयात खोटे ना हरकत प्रमाणपत्र आणि ठराव तयार केले. हे दस्तऐवज सन पॉवर इंडिया व्हेंचर्स प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले. परिणामी, नगरपंचायतचे विविध शुल्क – नगर कर, विकास शुल्क, बांधकाम परवानगी शुल्क इ. – अंदाजे दहा लाखांहून अधिक बुडवण्यात आले आणि शासनाची आर्थिक फसवणूक झाली.
तपासादरम्यान ही बाब स्पष्ट झाल्याने पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४२० (फसवणूक), ४६७ (खोटे दस्तऐवज तयार करणे), ४६८ (फसवणुकीच्या उद्देशाने बनावट दस्तऐवज तयार करणे) आणि ३४ (सामूहिक कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कपले करत असून, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता चौकशी अधिक खोलवर होण्याची शक्यता आहे.