देऊळगाव राजा येथील खुणाच्या प्रकरणात परस्परविरोधी तक्रारी दाखल; 20 आरोपींना पोलिसांकडून घेण्यात आली ताब्यात...
या हल्ल्यात आसीफ उर्फ आरिफ हारून पठाण (वय ३५) याच्यावर चाकू व कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी फिर्यादी शेख अतीक शेख उमर (वय ३३, रा. प्रतापनगर, देऊळगाव राजा) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, याच घटनेत दुसऱ्या गटाकडूनही तक्रार दाखल करण्यात आली. शेख मुजाहिद शेख अली (वय ४६, रा. हकीम कॉलनी, देऊळगाव राजा) यांच्या तक्रारीनुसार, आरोपींनी कट रचून हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीचा भाऊ शेख अनवर ऊर्फ अनु शेख अली (वय ४२) याच्यावर लोखंडी रॉड, चाकू व काठ्यांनी जबर मारहाण करण्यात त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या अनवर याचा मृत्यू झाला. तसेच फिर्यादी व साक्षीदारांनाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, कट रचणे यांसह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बुलडाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या. आरोपींच्या शोधासाठी देऊळगाव राजा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे.
पोलिसांच्या कारवाईत आतापर्यंत २० आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. देऊळगाव राजा परिसरात स्थानिक पोलीस, दंगल नियंत्रण पथक आणि क्यूआरटी पथकाचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे परिस्थिती सध्या पूर्णपणे पोलिसांच्या नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावरून अफवा अथवा भावना दुखावणारे संदेश प्रसारित करू नयेत, तसेच घटनेबाबत माहिती असल्यास ती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी व सपोनि. सविता कुळवार, देऊळगाव राजा करीत आहेत.