"या" एका आकड्यानेच सगळ्यांचे डोळे विस्फारले!'... एसपी निलेश तांबेंच्या नेतृत्वात जिल्हा पोलिसांची वर्षभरात मोठी कामगिरी..! कडक शिस्तीच्या एसपींमुळे नंबर दोनवाल्यांचे धाबे दणाणले...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गुन्हेगारांवर धडक कारवाया, अमली पदार्थांविरोधातील मोहीम, अवैध धंद्यांवर कठोर कारवाई, हरवलेल्यांचा शोध, फरार आरोपींची धरपकड आणि सायबर फसवणुकीतील लाखो रुपये परत मिळवून देण्यापासून ते तब्बल 19 कोटी 19 लाख 15 हजार 607 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यापर्यंत बुलढाणा जिल्हा पोलिसांनी 2026 या वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली आहे .पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिसांनी गुन्हे उकल, कायदा व सुव्यवस्था, प्रतिबंधात्मक कारवाया आणि समाजाभिमुख उपक्रमांमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. कडक शिस्तीच्या एसपींमुळे नंबर दोनवल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत हे वास्तव आहे.

गंभीर स्वरूपाच्या खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आदी गुन्ह्यांपैकी 79 टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात आली. या कारवाईदरम्यान 4 कोटी 7 लाख 61 हजार 329 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अमली पदार्थांविरोधात राबविण्यात आलेल्या 'मिशन परिवर्तन' अंतर्गत 55 गुन्हे दाखल करून 58 आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत 324.846 किलो गांजा आणि इतर अमली पदार्थांसह 1 कोटी 99 लाख 78 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यासोबतच जनजागृतीसाठीही विविध उपक्रम राबविण्यात आले. दारूबंदी, जुगार, अवैध शस्त्रबाळगणे, ई-सिगारेट, प्रतिबंधित गुटखा आणि अवैध रेती उत्खननाविरोधातही मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या. अवैध गौण खनिज चोरीच्या 53 गुन्ह्यांमध्ये 101 आरोपींना ताब्यात घेऊन वाहनांसह 5 कोटी 78 लाख 24 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर आर्म्स अॅक्ट अंतर्गत 19 गुन्ह्यांमध्ये विविध शस्त्रे आणि वाहनांसह 45 लाख 96 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.जिल्ह्यात हरवलेले 217 मोबाईल शोधून त्यांच्या मालकांकडे परत देण्यात आले. अपहरणाच्या 110 प्रकरणांपैकी 91 व्यक्तींची सुखरूप सुटका करण्यात आली. तसेच हरवलेल्या 718 व्यक्तींपैकी 512 जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून उर्वरितांचा शोध सुरू आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात 55 हजार 929 प्रकरणांमध्ये कारवाई करून 4 कोटी 14 लाख 46 हजार 450 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच ड्रंक अँड ड्राईव्हच्या 112 प्रकरणांवरही कारवाई करण्यात आली.दोन ते तीन वर्षांपासून फरार असलेल्या 38 आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयीन कामकाजात प्रभावी पाठपुरावा केल्यामुळे अनेक प्रकरणांत आरोपींना शिक्षा झाली, तर सायबर फसवणुकीतील तक्रारदारांना एकूण 17 लाख 28 हजार 138 रुपये परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले.

याशिवाय प्रतिबंधात्मक कारवाया, महिला व बालक सुरक्षा जनजागृती, आपत्कालीन क्रमांक 112 आणि NCCRP पोर्टलबाबत जनजागृती, सायकल व मोटारसायकल रॅली, वृक्षारोपण अशा समाजाभिमुख उपक्रमांद्वारे पोलिसांनी नागरिकांशी संवादही वाढविला. बुलढाणा जिल्हा पोलिसांनी 2026 या वर्षात विविध कारवायांमधून एकूण 19 कोटी 19 लाख 15 हजार 607 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण, अवैध धंद्यांवर कठोर कारवाई आणि नागरिकाभिमुख उपक्रमांमुळे बुलढाणा पोलिसांची वर्षभरातील कामगिरी विशेषच ठरली आहे...