ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे तुर - हरबऱ्याच्या उत्पादनात होणार मोठी घट! भाजीपाल्याचेही नुकसान; सरकारदरबारी मात्र या नुकसानीची नोंद नाही...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण आहे. मागील आठवड्यात सिंदखेडराजा - देऊळगावराजा तालुक्यात तुफान गारपीट झाली. यामुळे जिल्ह्यातील २ लाख १३ हजार शेतकरी संकटात सापडल्याची नोंद सरकार दफ्तरी आहे. १ लाख ६ हजार ८०८ हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा शासनाचा अहवाल आहे. मात्र असे असले तरी प्रत्यक्षात मात्र अधिकचे नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र मोठे नुकसान झाले आहे, मात्र शासनाच्या निकषानुसार या नुकसानीची नोंदच झालेली नाही.
                 जाहिरात 
जिल्ह्यातल्या साडेसात लाख हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्रात रब्बीची पेरणी झाली आहे. तुर आणि हरभरा पीक ऐन फुलांच्या बहरात असताना जिल्ह्यात सर्वत्र धुक्याची चादर पसरली ,यामुळे फुले गळून पडल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे. हरभरा पिकाची देखील तीच परिस्थिती आहे. शिवाय भाजीपाला पिकांनाही या धुक्याचा फटका बसल्याने उत्पादनात ६० ते ७० टक्के घट होण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट वगळता शासनाने जिल्ह्यात इतर भागात पंचनामे केलेले नाहीत. त्यामुळे एवढे नुकसान होऊनदेखील नुकसान भरपाई मिळण्याची सुतराम शक्यता नाही. मात्र वस्तुस्थिती ध्यानात घेऊन शासनाने शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज आहे...