मेहकर-लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; ॲड.जयश्री शेळके यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी; शासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी.....

 
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :चार दिवसांपूर्वी मेहकर तालुक्यात ढगफुटी सदृश मुसळधार पावसाने थैमान घातले. मेहकर व लोणार तालुक्यातील अनेक गावांमध्ये पेरण्या उलटल्या असून, जमिनी खरडून गेल्या आहेत. मागील ३४ वर्षांमध्ये एवढ्या प्रमाणात पाऊस झालेला नव्हता, असे जुनी जाणकार मंडळी सांगतात. आज ॲड. जयश्री शेळके यांनी मेहकर तालुक्यातील कल्याणा मंडळातील बार्हई शिवारात काही नुकसानग्रस्त शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली.

सामान्यतः ६५ मिलिमीटरहून अधिक पाऊस अतिवृष्टीत गणला जातो, मात्र या दोन तालुक्यांमध्ये कमाल १९३ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यामुळे सोयाबीन, मूग, उडीद, तूर, हळद तसेच भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, मेहकर तालुक्यातील सुमारे २३ हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीने बाधित झाले असून, सुमारे ४८ हजार शेतकरी अडचणीत सापडले आहेत. विशेषत: मेहकर तालुक्यात दीड हजार हेक्टरवर झालेल्या सोयाबीनच्या पेरण्या पाण्याखाली गेल्या आहेत.
पाहणीदरम्यान ॲड. शेळके यांनी मा. उपविभागीय अधिकारी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून, मेहकर व लोणार तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तातडीने करावेत, अशी मागणी केली. तसेच, पंचनामे करताना शेतकरी बांधवांचे सोलर पॅनल, ठिबक व स्प्रिंकलर पाईप यांचे नुकसान झाल्यास त्याचाही तपशील नोंदवावा, आणि शासनामार्फत तातडीची मदत शेतकऱ्यांना पुन्हा पेरणीसाठी द्यावी, अशी विनंती केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिके उध्वस्त झाली असून, शेतकऱ्यांवर पुन्हा पेरणीचे मोठे आर्थिक ओझे येणार आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या हाकेला प्रतिसाद देत तातडीने पंचनामे पूर्ण करून योग्य ती नुकसानभरपाई व मदत जाहीर करावी, अशी ठाम अपेक्षा ॲड.जयश्री शेळके यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख आशिषभाऊ रहाटे, मा.सरपंच शरद पागोरे, माधवराव पागोरे, प्रशांत पागोरे, वैभव पागोरे, सुरेश पागोरे, वसंतराव पागोरे, प्रदिप पागोरे, तुषार पागोरे, कडुबा पागोरे, विश्वनाथ पागोरे, रुपराव पागोरे, अरविंद पागोरे, देवेश पागोरे, महेश पागोरे, गजानन पागोरे, सतिश पागोरे, सुभाष पागोरे, श्रेयस पागोरे तसेच गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.