पालखीच्या मागे स्वच्छता दिंडी; भक्तीच्या वाटेवर स्वच्छतेचा संदेश! खामगाव–शेगाव पालखी मार्गावर ॲड. शर्वरी तुपकर यांच्या नेतृत्वात "रविकांत तुपकर युथ फाउंडेश आणि सखी प्रतिष्ठान बुलडाणा"

यांचा अनोखा उपक्रम; हातात झाडू घेत भाविकांसोबत स्वच्छतेची वारी

 
खामगाव:(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): लाखो भाविकांच्या जयघोषाने आणि ‘गण गण गणात बोते’च्या भक्तिमय गजराने आज खामगाव–शेगाव मार्ग दुमदुमून गेला. तब्बल दोन महिन्यांचा आणि सुमारे पंधराशे किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करून श्री संत गजानन महाराजांची पालखी आज पहाटे साडेपाच वाजता खामगावहून शेगावकडे मार्गस्थ झाली. पालखीच्या या अंतिम १८ किलोमीटरच्या टप्प्यावर भक्तीचा महासागरच लोटला.याच भक्तिमय वातावरणात रविकांत तुपकर युथ फाउंडेशन आणि सखी प्रतिष्ठान, बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. ॲड. शर्वरी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली ‘खामगाव–शेगाव पालखी मार्ग स्वच्छता दिंडी’ काढण्यात आली.

पालखी पुढे गेल्यानंतर तिच्या मागे राहिलेला कचरा उचलत ही स्वच्छता दिंडी मार्गक्रमण करत होती. रस्त्यावर पडलेल्या पाण्याच्या पिशव्या, रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची पाकिटे आणि इतर कचरा गोळा करून मार्ग स्वच्छ करण्यात आला. विशेष म्हणजे, केवळ स्वच्छतेचा संदेश देण्यापुरते मर्यादित न राहता ॲड. शर्वरी तुपकर यांनी स्वतः हातात झाडू घेत स्वच्छता केली.

त्यांच्यासोबत रविकांत तुपकर युथ फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि सखी प्रतिष्ठानच्या महिला सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी ॲड. शर्वरी तुपकर यांनी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांशी संवाद साधत ‘महाराजांच्या दर्शनासोबत स्वच्छतेची सेवा हीच खरी भक्ती’ असा संदेश दिला.

 

 श्री संत गजानन महाराजांची पालखी म्हणजे लाखो भाविकांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा सोहळा. या सोहळ्यात सहभागी होताना पर्यावरण आणि स्वच्छतेची जबाबदारीही प्रत्येक भाविकाने स्वीकारावी, हा संदेश या स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून देण्यात आला.महाराजांच्या पालखीसमोर भाविकांची दिंडी आणि पालखीच्या मागे स्वच्छतेची दिंडी, असे या उपक्रमाचे अनोखे चित्र आज खामगाव–शेगाव मार्गावर पाहायला मिळाले. स्वच्छतेचा हा उपक्रम केवळ रस्ता स्वच्छ करण्यापुरता नव्हता; तर ‘सेवा हीच भक्ती आणि स्वच्छता हीच सामाजिक जबाबदारी’ हा विचार जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न होता.या उपक्रमात जिल्हाध्यक्ष क्रांतिकारी संघटना डॉ. टाले, विनायक सरनाईक, रामेश्वर अंभोरे, साक्षी रामेश्वर अंभोरे, गजानन टेकाळे, जया गजानन टेकाळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार, कार्तिक खेडेकर, ॲड. प्रवीण सुरडकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व महिला सहभागी झाल्या.