लोणार शहरात सततच्या लोडशेडिंगला कंटाळून नागरिकांचे ठिय्या आंदोलन; लोडशेडिंग बंद करण्याची महावितरणकडे मागणी !

 
 लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील धार रोडसह इतर भागांत गेल्या दोन दिवसांपासून लोडशेडिंग सुरू आहे. काही भागांत वीजपुरवठा बंद तर काही भागांत सुरळीत असल्याने नागरिकांमध्ये संताप उसळला. यामुळे संतप्त नागरिकांनी ९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता महावितरणच्या उपकेंद्रावर धडक देत अभियंत्याला जाब विचारला व कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी नागरिकांनी लोडशेडिंग तात्काळ बंद करण्याची मागणी केली.

शहरात वाढत्या विजचोरीवर नियंत्रण आणण्यासाठी महावितरणने अलीकडेच धडक मोहीम राबवून लाखो रुपयांचा दंड वसूल केला. तरीदेखील विजचोरी सुरूच असल्याने काही भागातच लोडशेडिंग केली जात असून, निष्पाप नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. “लोडशेडिंग करायची असेल तर ती संपूर्ण शहरात समानपणे करा,” अशी ठाम मागणी नागरिकांनी अभियंत्यांना केली.
आंदोलनादरम्यान संतप्त नागरिकांनी एक तास संपूर्ण लोणार शहरातील वीजपुरवठा बंद करून कार्यालयासमोर ठिय्या मांडला. “एमईसीबी मुर्दाबाद”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
नागरिकांचा रुद्रावतार पाहून पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.