चिखलीचे सुपुत्र हरिदास कापसे अनंतात विलीन! ‘भारत माता की जय’, ‘शहीद जवान अमर रहे’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला; शासकीय इतमामात वीर जवानाला अखेरचा निरोप! शेवटचा निरोप देण्यासाठी जनसागर उसळला...

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):उत्तराखंडमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले चिखलीचे सुपुत्र हवालदार हरिदास मधुकर कापसे (वय 36) यांच्यावर आज चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी चिखलीकरांचा अक्षरशः जनसागर उसळला होता. ‘शहीद जवान अमर रहे... भारत माता की जय...’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या भावविवश वातावरणात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हरिदास कापसे पंचतत्त्वात विलीन झाले.

 

देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना उत्तराखंडमध्ये हवालदार हरिदास कापसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज त्यांचे पार्थिव चिखलीत दाखल झाल्यानंतर दांडगे ले-आऊट येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंतिम यात्रेला सुरुवात झाली.

ही अंतिम यात्रा सिद्ध सायन्स चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक मार्गे तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर पोहोचली. मार्गाच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या शहरातील सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी आबालवृद्ध रस्त्याच्या दुतर्फा उभे होते.

घोषणांनी आसमंत दुमदुमला; डोळ्यांत अश्रू...

अंतिम यात्रेदरम्यान ‘शहीद जवान हरिदास कापसे अमर रहे!’, ‘भारत माता की जय!’ अशा घोषणांनी चिखलीचा आसमंत निनादून गेला. देशासाठी कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानाला निरोप देताना उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू होते. प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार्थिव पोहोचताच वातावरण अधिकच भावूक झाले. हजारो नागरिकांनी वीर जवानाचे अंतिम दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मान्यवरांची उपस्थिती

या अंत्यसंस्काराला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आमदार श्वेताताई महाले पाटील, आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी, पोलीस अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रशासनाच्या वतीने तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण अंत्यविधी शासकीय इतमामात पार पडला.

हवेत पाच फैरी; वीर जवानाला अखेरची मानवंदना

शासकीय इतमामाचा भाग म्हणून जवानांनी हवेत पाच फैरी झाडून हवालदार हरिदास कापसे यांना अखेरची मानवंदना दिली. बंदुकीच्या फैरींच्या आवाजाने परिसर स्तब्ध झाला. त्यानंतर राष्ट्रध्वज तिरंगा कापसे कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.

तिरंगा कुटुंबीयांच्या हातात सोपविण्यात येताच उपस्थितांचे मन हेलावून गेले. ज्या तिरंग्याच्या सन्मानासाठी हरिदास कापसे यांनी आयुष्य देशसेवेला वाहिले, तोच तिरंगा आज त्यांच्या कुटुंबीयांच्या हाती सुपूर्द झाला.
चिखलीच्या मातीत जन्मलेला हा वीर सुपुत्र आज पंचतत्त्वात विलीन झाला; मात्र देशसेवेसाठी दिलेले त्यांचे बलिदान चिखलीकरांच्या आणि संपूर्ण देशाच्या स्मरणात कायम राहणार आहे.