लोणार सरोवराच्या शाश्वत विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर! ४३४ कोटींच्या विकास आराखड्याला वेग! ३ महिन्यांत मागवला "ॲक्शन टेकन रिपोर्ट..."
Jun 6, 2026, 20:06 IST
बुलढाणा (जिमाका : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जागतिक पातळीवरील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक आश्चर्य, विवर क्षेत्र आणि आंतरराष्ट्रीय रामसार स्थळ असलेल्या लोणार सरोवराचे संवर्धन, जतन आणि ऐतिहासिक वैभव जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गतीमान पावले उचलली आहेत. पर्यटन आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून जागतिक नकाशावर असलेल्या या अमूल्य वारशाचे शास्त्रोक्त पद्धतीने जतन व्हावे, यासाठी मुख्यमंत्री स्तरावर विशेष लक्ष दिले जात असून, प्रशासकीय प्रक्रियांना कमालीची गती देण्यात आली आहे. लोणार सरोवर जतन, संवर्धन आणि विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या सर्व कामांचा आणि आगामी काळातील नियोजित प्रक्रियेचा सविस्तर 'ॲक्शन टेकन रिपोर्ट' (Action Taken Report) पुढील ३ महिन्यांत थेट मुख्यमंत्री कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांना दिले आहेत, जेणेकरून या जागतिक वारशाचा विकास अत्यंत दर्जेदार पद्धतीने आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण होईल.
केंद्रीय वन, पर्यावरण आणि पर्यटन मंत्रालयाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेत लोणार सरोवराच्या पुनरुज्जीवनासाठी यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारत सरकार स्तरावर महत्त्वपूर्ण पाठपुरावा केला आहे. हाच वारसा पुढे नेत आता राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे सादर करावयाचा सविस्तर आणि सर्वसमावेशक आराखडा (मास्टर प्लॅन) अधिक परिपूर्ण व मजबूत केला जात आहे. केंद्र सरकारकडे रीतसर प्रस्तावांचा वेगाने पाठपुरावा करून सर्व प्रलंबित प्रक्रियांना गती दिली जात असून, या सर्व नियोजित कामांसाठी एक निश्चित कालमर्यादा (Timeline) आणि प्रशासकीय उत्तरदायित्व निश्चित करून प्रत्यक्ष कृती तातडीने सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत मागील काही काळापासून निसर्गचक्र आणि अंतर्गत जलस्रोतांमुळे लक्षणीय वाढ झाली आहे. सरोवराचे पाणी सरासरी २० मीटर आतपर्यंत शिरले असून, जलपातळी उन्हाळ्याच्या तुलनेने ३ ते ४ मीटरने वाढल्यामुळे काठावरील काही प्राचीन मंदिरे आणि नैसर्गिक वनसंपदा पाण्याखाली गेली आहे. या परिस्थितीचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि येथील प्राचीन मंदिरांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासन अत्यंत वैज्ञानिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून काम करत आहे.
प्रत्यक्ष पाहणी दरम्यान गोमुख धार, पापारेश्वर मंदिर परिसर आणि सीतानान्ही येथील नैसर्गिक झऱ्यांमधून मिळून साधारणतः २४ हजार ५४० लीटर प्रति तास एवढा प्रचंड पाण्याचा प्रवाह विवर क्षेत्रात येत असल्याचे ९० डिग्री V-Notch मोजमापाद्वारे सिद्ध झाले आहे. या गोड पाण्याचा pH ७.०० च्या आसपास असून, सरोवराच्या मुख्य पाण्याचा pH १०.०० ते ११.०० च्या दरम्यान असल्याने या पाण्याच्या पातळीतील वाढीचा शाश्वत अभ्यास केला जात आहे.
उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आयुक्त, अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी एक विशेष तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली आहे. या अंतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे (GSDA) तज्ज्ञ भूवैज्ञानिक मे २०२६ ते सप्टेंबर २०२७ या कालावधीत संपूर्ण एक हायड्रोलॉजिकल सायकलचा सविस्तर अभ्यास करणार आहेत. यासाठी विशेष निरीक्षण विहिरी स्थापित करण्यात येत असून, मान्सूनपूर्व व मान्सूनोत्तर कालावधीतील नोंदींच्या आधारे सरोवराच्या भूजल संरक्षणाचा सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे.
विशेष म्हणजे, लोणार सरोवराचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी एकूण ४३४.६२ कोटी रुपयांच्या सुधारित जतन व विकास आराखड्याला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या भव्य प्रकल्पामध्ये एकूण ९ कार्यान्वयीन यंत्रणांचा सहभाग असून, सद्यस्थितीपर्यंत या आराखड्यासाठी २१९.७४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे (५१ टक्के), ज्यामधून २०९.८५ कोटी रुपयांचे वितरण विविध यंत्रणांना करण्यात आले आहे. आराखड्यातील एकूण ७६ कामांपैकी ३३ महत्त्वाची कामे (४३ टक्के) यशस्वीरित्या पूर्ण झाली असून ३१ कामे (४१ टक्के) सद्यस्थितीला युद्धपातळीवर प्रगतीपथावर आहेत, तर उर्वरित ९ कामे अंदाजपत्रक स्तरावर आहेत.
पूर्ण झालेल्या कामांमध्ये सरोवराच्या काठावरील स्मशानभूमी व कब्रस्तानचे २.२५ कोटी रुपये खर्चून केलेले यशस्वी स्थानांतरण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची दुरुस्ती, पर्यटकांसाठी ३.५ किलोमीटर लांबीचा पदपथ, निसर्ग पाऊलवाटा, माहिती केंद्र, पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांची उपलब्धता आणि विवर क्षेत्राबाहेरील ४० हेक्टर क्षेत्रातील वेडी बाभूळ निष्कासित करून मोठ्या प्रमाणावर केलेली शाश्वत वृक्षलागवड यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.
तसेच प्रगतीपथावर असलेल्या कामांमध्ये नगर परिषदेमार्फत १०६.७० कोटी रुपयांची नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रणाली व भूमिगत गटार योजना, शहराची ३५ कोटींची पाणीपुरवठा योजना, १३.६१ कोटींचा लोणार-किन्ही रस्ता बायपास आणि तारांगण व प्रादेशिक संग्रहालयाच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. लोणार सरोवराचे जागतिक महत्त्व आणि पर्यावरण अबाधित ठेवून पर्यटनाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण प्रशासन पूर्ण ताकदीने आणि सकारात्मकतेने कार्यरत आहे.