छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर चिखलीत यशस्वी!आ. श्वेता महाले पाटील यांच्या पुढाकाराने नागरिकांना एकाच छताखाली मिळाल्या शासकीय सेवा....

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):‘सर्व महसुली सेवा एकाच ठिकाणी, एकाच दिवशी’ या संकल्पनेवर आधारित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ टप्पा क्र. ०१ अंतर्गत आयोजित करण्यात आलेले महसूल समाधान शिबिर चिखली तहसील कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग व नगर विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस तथा महसूलमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व पुढाकारामुळे हे शिबिर यशस्वीपणे साकार झाल्याचे उपस्थितांनी नमूद केले. आमदार श्वेता महाले पाटील यांनी आपल्या प्रतिनिधींमार्फत शिबिरात सहभाग नोंदवत आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.
या शिबिरामध्ये महसूल विभागाचे विविध दाखले व प्रमाणपत्रे, घरकुल योजना, महिला बचत गट लाभ, पीएम किसान नोंदणी, विवाह नोंदणी, दिव्यांग व माजी सैनिकांसाठीच्या विविध सुविधा अशा अनेक शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना तत्काळ व एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे विविध शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या मारण्यापासून नागरिकांची मोठी बचत झाली. प्रशासन थेट जनतेच्या दारी पोहोचवणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने लोकाभिमुख ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
शिबिराचे उद्घाटन श्री. अंकुशराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख होते. यावेळी तहसीलदार विजय सवडे, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, तालुका कृषी अधिकारी अशोक सुरडकर, उपनगराध्यक्ष वैशालीताई कपिल खेडेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती सुषमाताई चव्हाण, युवा मोर्चा शहराध्यक्ष विजय वाळेकर, नगरसेवक गोपाल देव्हडे, दीपक खरात, डॉ. महमद इसरार, ज्योतीताई वाळेकर, बाळू जाधव, राम बनसोडे, सुरेंद्र ठाकूर, कैलास खराडे, नायब तहसीलदार मुरली गायकवाड, अर्जुन इंगळे, मंडळ अधिकारी पवार, तलाठी अनिरुद्ध खेडेकर, पुरवठा अधिकारी श्रीमती सोनकाबळे, विस्तारक सिद्धेश्वर ठेंग, संतोष देशमुख, प्रशांत भटकर, शेख आसिफ भाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.