"चेक बाऊन्स" म्हणजे सोप्प नाही भावा! बुलढाण्यात न्यायालयाने शिक्षकाला सुनावला ३ महिन्याचा सश्रम कारावास अन् तब्बल २ लाख ८० हजारांचा दंड..वाचा नेमका विषय काय?

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): समोरच्या व्यक्तीचे समाधान व्हावे म्हणून कधीकधी त्याला चेक दिल्या जातो, बऱ्याचदा त्या खात्यात तेवढी रक्कमच नसते. मात्र असे करणे मोठे संकट ओढावून आणू शकते. बुलढाणा न्यायालयाने या संदर्भात दिलेला निर्णय हा चेक बाउन्स करणाऱ्यांसाठी मोठा धडा ठरला आहे. एका प्रकरणात न्यायालयाने आरोपीला ३ महिन्यांचा सश्रम कारावास आणि तब्बल २ लाख ८० हजार रुपये दंड एवढी शिक्षा सुनावली आहे.

बुलढाणा येथील रहिवासी संदीप अच्युतराव गवई यांनी जानोरी ता.शेगाव येथील महाराष्ट्र विद्यालयात शिक्षक असलेल्या नरेंद्रसिंग रामसिंग राजपूत यांना १ लाख ७० हजार रुपये उसने दिले होते. मात्र ठरलेल्या मुदतीत गवई यांना पैसे परत मिळाले नाहीत. वारंवार तगादा लावल्यानंतर अखेर आरोपी नरेंद्रसिंग राजपूत यांनी गवई यांना १ लाख ७० हजार रुपयांचा चेक दिला. चेक घेऊन गवई संबंधित बँकेत गेले असता खात्यात रक्कम नसल्याने तो चेक बाऊन्स झाला. 
  या प्रकारानंतर संदीप गवई यांनी ॲड. गुणवंत नाटेकर यांच्या मार्फत न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयात सविस्तर सुनावणी झाल्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपी नरेंद्रसिंग राजपूत यांना दोषी ठरवले. त्यानुसार आरोपीला तीन महिन्यांचा सश्रम कारावास तसेच २ लाख ८० हजार रुपये एवढा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास आणखी एक महिना सश्रम कारावास अशी शिक्षा आरोपीला भोगावी लागणार आहे. ॲड. गुणवंत नाटेकर यांनी याप्रकरणात फिर्यादीची जमेची बाजू मांडली.