रोखठोक : तुपकरच तापेने फणफणताहेत!; ज्‍यांच्‍यासाठी लढा, त्‍यांचे रक्‍त थंडच!

 

मनोज सांगळे, संपादक, बुलडाणा लाइव्ह
सोयाबीन, कापूस उत्‍पादकांचा मोठा लढा उभारून त्‍यांच्‍या मागण्या मान्य करून घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची रविकांत तुपकररूपी तोफ सध्या सरकारवर तुटून पडलीये. पण ज्‍या शेतकऱ्यांसाठी त्‍यांची ही लढाई सुरू आहे, त्‍यांचे रक्‍त जणू थंडीत गारठले आहे. ज्‍या व्यापक प्रमाणावर शेतकऱ्यांनी या लढ्याला बळ द्यायला हवे, तसे चित्र अद्याप तरी दिसून आलेले नाही. तुपकर तापेने फणफणले आहेत. तरीही मागण्या मान्य होईपर्यंत अन्‍नाचा कणही पोटात न जाऊ देण्याचा निर्धार त्‍यांनी केला आहे. आज, १८ नोव्‍हेंबरला तुपकरांना नागपुरातून अटक करून बुलडाण्यात आणण्यात आले. इथेही त्‍यांनी अन्‍नत्‍याग सत्याग्रह सुरूच ठेवला आहे. एवढे सारे घडले तरी सत्ताधारी आणि जिल्हा प्रशासनाकडून मात्र त्‍यांच्‍याकडे दूर्लक्ष सुरू आहे. तुपकरांना शेतकऱ्यांची व्यापक साथ लाभली तर मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवर दबाव वाढू शकतो, हे शेतकऱ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे.

"स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांनी काल, १७ नोव्हेंबर नागपूरच्या संविधान चौकात अन्‍नत्‍याग सत्याग्रह सुरू केला. त्‍यांच्‍या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले. काल दिवसभर ते तापाने फणफणत असल्याने व सर्दी खोकला वाढल्याने नागपूर जिल्हा प्रशासनाने दिवसातून पाच वेळा तुपकर यांची तपासणी केली. रात्री साडेअकराला त्यांना अटक करून आज पहाटे बुलडाण्यात आणण्यात आले. आता तुपकरांनी त्यांच्या बुलडाणा शहरातील अष्टविनायकनगरातील निवासस्थानासमोरच आंदोलन सुरू ठेवले आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने तुपकरांच्या आंदोलनाकडे सध्या तरी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. काल दिवसभराचे आंदोलन, रात्रीची अटकेची कारवाई, नागपूर ते बुलडाण्यापर्यंतचा प्रवास आणि आज पुन्हा अन्‍नत्याग सत्याग्रह यामुळे तुपकरांची तब्येत अधिकच खालावली आहे.

प्रशासनाने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची तसदीसुद्धा घेतलेली नाही. कदाचित शेतकऱ्यांचे काही आंदोलन सुरू आहे हे त्यांच्या गावीही नसावे, असेच जणू चित्र आहे. दुसरीकडे प्राण गेले तरी मागे हटणार नाही, अशी भूमिका तुपकरांनी घेतली आहे. तुपकरांसोबत कार्यकर्त्यांनीसुद्धा अन्‍नत्याग सत्याग्रहात सहभाग घेतला. मात्र सकाळपासून एकाही अधिकाऱ्याने आंदोलनस्थळ गाठले नाही. प्रशासन मुद्दामहून हे आंदोलन चिरडण्यासाठी आडमुठी भूमिका येत असून, आता आंदोलन उग्र रूप धारण करेल. आता ही आरपारची लढाई आहे, असे रविकांत तुपकरांनी बजावले आहे. दिल्लीत शेतकरी आंदोलनात ज्‍या पद्धतीने शेतकरी स्वयंस्‍फूर्तीने सहभागी झाले आणि आजवर हे आंदोलन रेटले. उन्हात-पावसातही आंदोलन कायम ठेवले त्‍या पद्धतीची धग या आंदोलनात अजूनही पेटलेली दिसत नाही. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी त्‍यांच्याच महत्त्वाच्या प्रश्नासाठी व्यापक प्रमाणावर जोपर्यंत तुपकरांना साथ देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सरकारस्तरावर गांभीर्याने घेतलेही जाणार नाही, हे शेतकऱ्यांनीच लक्षात घेतले पाहिजेत.

पोलीस बरे म्‍हणावेत...
जिल्हा प्रशासनापेक्षा नागपूरचे पोलीस बरे असे म्‍हणावे लागेल. त्‍यांनी अटक करून आणताना प्रवासात अनेकदा तब्येत बरी नसल्याने तुपकरांना काही खाण्याचा सल्ला दिला. मात्र तुपकर निर्धारावर कायम राहिले. त्‍यांची वैद्यकीय तपासणीही नागपूर पोलिसांनी केली होती. पोलिसांचा कडा पहारा सध्या निवासस्थानसमोर लावण्यात आला आहे.

काय आहेत मागण्या...
सोयाबीनला किमान ८ हजार, कपाशीला १२ हजार रुपये भाव जाहीर करावा. सोया पेंडची आयात थांबवावी, १०० टक्के पीकविमा, शेतातील लोडशेडिंग व कनेक्शन कापणे बंद करा, सक्तीची वीज वसुली बंद करा, अतिवृष्टीग्रस्तांना भरीव मदत करा आदी मागण्यांसाठी हा सत्याग्रह सुरू आहे.