समृद्धी महामार्गावर कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक; ७४ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, दोघे गंभीर!
मिळालेल्या माहितीनुसार, कार क्रमांक एमएच ०१ ईव्ही ९३२१ नागपूरहून मुंबईच्या दिशेने जात होती. या कारमध्ये चालक शोएब खान (वय ३५), नदीम खान (वय ६५) आणि नसीम खान (वय ७४, तिघेही रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान कारने पुढे जात असलेल्या एका अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघाताची माहिती समृद्धी महामार्गाच्या छत्रपती संभाजीनगर येथील सीआरओने दूरध्वनीद्वारे मलकापूर येथील समृद्धी महामार्ग उपकेंद्राला दिली. माहिती मिळताच संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात नसीम खान यांचा मृत्यू झाला, तर चालक शोएब खान आणि नदीम खान हे गंभीर जखमी झाले.
दोन्ही जखमींना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून तातडीने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघातामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला करण्यात आली.