दुष्काळसदृश १८ जिल्ह्यांच्या यादीतून बुलढाण्याला डच्चू! रविकांत तुपकरांचा सत्ताधाऱ्यांना थेट सवाल; “लोकांनी तुम्हाला झोपा काढायला निवडून दिलंय का? मंत्रालयात जाऊन शेतकऱ्यांसाठी भांडा!”
“एसी केबिनमध्ये बसून दुष्काळाची यादी तयार करता? शेतकऱ्यांच्या बांधावर या आणि पिकांची अवस्था पाहा!”; बुलढाण्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, अन्यथा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडण्याचा रविकांत तुपकरांचा आक्रमक इशारा
बुलढाण्यात पिके करपली, तरी सरकारला दिसत नाही का?
बुलढाणा जिल्ह्यात तब्बल दीड महिन्याच्या कालावधीत पावसाचा मोठा खंड पडला. कडक उन्हामुळे सोयाबीनसह इतर खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पावसाऐवजी कडक ऊन पडल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे. १२ सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला असला, तरी पिकांना आवश्यक असलेल्या काळात पाऊस न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे तुपकरांनी म्हटले आहे.
सत्ताधारी लोकप्रतिनिधीना सुनावले खडे बोल!
बुलढाणा जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे एक खासदार आणि सहा आमदार आहेत. या सर्व लोकप्रतिनिधींना लक्ष्य करत रविकांत तुपकरांनी थेट सवाल केला. “लोकांनी तुम्हाला झोपा काढायला निवडून दिलं आहे का? गल्लीत आणि मतदारसंघात राजकीय स्वार्थासाठी एकमेकांशी भांडत बसण्यापेक्षा मंत्रालयात जाऊन जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी भांडा. शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे,” अशा शब्दांत तुपकरांनी सत्ताधारी लोकप्रतिनिधींना सुनावले.
दुष्काळसदृश १८ जिल्ह्यांची यादी करताना बुलढाण्यासह दुष्काळाची झळ सोसणाऱ्या इतर जिल्ह्यांचाही समावेश करावा, अशी मागणी तुपकरांनी केली आहे. केवळ कागदावरील आकडे आणि अहवालाच्या आधारे निर्णय न घेता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याची मागणी त्यांनी केली.“एसी केबिनमध्ये बसून दुष्काळ ठरवू नका. शेतकऱ्यांच्या बांधावर या, करपलेली पिकं पाहा, शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहा आणि मग निर्णय घ्या,” असे तुपकरांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले.
बुलढाण्याला कोरडा दुष्काळ जाहीर करा, अन्यथा...
बुलढाणा जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना आवश्यक मदत द्यावी आणि दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीत बुलढाण्याचा समावेश करावा, अशी मागणी रविकांत तुपकरांनी केली. “बुलढाण्याला दुष्काळसदृश यादीत समाविष्ट करा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या. अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावर उतरू. सत्ताधाऱ्यांना आमच्या स्टाईलने जाब विचारू आणि सळो की पळो करून सोडू,” असा आक्रमक इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.