Exclusive बाप्पाच्या विसर्जनासाठी बुलढाणा पोलिसांचा ‘फुलप्रूफ’ बंदोबस्त! जिल्हाभरातील विसर्जन मिरवणुका निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी तब्बल
३,८०० हून अधिक पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त; SRPF, क्यूआरटीसह दंगा नियंत्रण पथके सज्ज!
जिल्ह्यातील बंदोबस्तासाठी १ पोलीस अधीक्षक, २ अपर पोलीस अधीक्षक, ६ SDPO, २५ PI, १३९ API आणि तब्बल १,९०० पोलीस अंमलदार तैनात राहणार आहेत. त्यासोबतच सशस्त्र क्यूआरटी, आरएसपी पथके आणि क्यूआरटी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे बाहेरील भागातूनही अतिरिक्त मनुष्यबळ बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाले आहे. यामध्ये SRPFची एक कंपनी व एक प्लाटून, २७ प्रशिक्षणार्थी PSI, २४० प्रशिक्षणार्थी पोलीस अंमलदार आणि १,४४३ गृहरक्षक यांचा समावेश आहे.
विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संवेदनशील ठिकाणे, प्रमुख चौक, विसर्जन मार्ग आणि घाट परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच पोलीस ठाणे स्तरावर दंगा नियंत्रणाची रंगीत तालीमही घेण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या या व्यापक नियोजनामुळे उद्याचा गणेश विसर्जन सोहळा शांतता, उत्साह आणि शिस्तीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गणेशभक्तांनीही पोलिसांना सहकार्य करून उत्साहात, मात्र जबाबदारीने गणरायाला निरोप द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.