राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसाठी बुलढाणा पॅटर्न ठरणार आदर्श;"हा "
तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचा राज्यस्तरावर गौरव...!

 
 बुलढाणा (जिमाका/बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करून प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी राबविलेल्या 'सहज प्रणाली' या नावीन्यपूर्ण उपक्रमाची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बुलढाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा विद्यमान पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांचा मुंबई येथे विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
सह्याद्री अतिथीगृहात गौरव सोहळा : महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या वतीने २८ एप्रिल २०२६ रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात 'द्वितीय सेवा हक्क दिन' राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव यांच्या शुभहस्ते डॉ. किरण पाटील यांना सन्मानित केले जाईल. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या सचिव वैशाली राज चव्हाण यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.
'सहज प्रणाली' ठरली दिशादर्शक: डॉ. किरण पाटील यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना सामान्य नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभतेने मिळाव्यात, यासाठी 'सहज प्रणाली' हा नाविन्यपूर्ण उपक्रम अत्यंत प्रभावीपणे राबविला. या उपक्रमामुळे प्रशासकीय कामात सुसूत्रता येऊन नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचण्यास मोठी मदत झाली. डॉ. पाटील यांनी राबविलेला हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श प्रस्थापित करणारा ठरला असून, राज्यातील इतर जिल्हाधिकाऱ्यांनाही यातून प्रेरणा मिळावी, या हेतूने आयोगामार्फत त्यांचा यथोचित सन्मान केला जात आहे.
या गौरव सोहळ्याला राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त आणि मुख्य सचिव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. डॉ. किरण पाटील यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.